पद्मश्री डॉ. अशोक खाडेंसारखे उद्योजक देशाच्या आर्थिक प्रगतीचे बळ – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0

मिरज (प्रतिनिधी)

“पद्मश्री डॉ. अशोक खाडे यांच्यासारख्या उद्योजकांमुळे देशाची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे. त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उद्योगक्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली असून त्यांचा संघर्षमय प्रवास आणि कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, ख्यातनाम उद्योगपती तथा पद्मश्री डॉ. अशोक (आबा) खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान झाल्यानिमित्त मिरजेत बालगंधर्व येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डॉ. खाडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

ते पुढे म्हणाले कि, डॉ. अशोक खाडे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर केवळ उद्योगविश्वात नव्हे, तर संपूर्ण देशात सांगली जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारून त्यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “खाडे बंधूंनी उभारलेली ‘दास ऑफशोअर’ कंपनी आज देश-विदेशात यशस्वीपणे कार्यरत आहे. अथक परिश्रम, जिद्द, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी उद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या यशाचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रमास डॉ. अशोक खाडे यांच्या मातोश्री तानूबाई खाडे, आमदार सुरेश खाडे, सुमनताई खाडे, जयश्री खाडे, सुशांत खाडे, स्वाती खाडे, रसिका खाडे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, धैर्यशील कदम, सुहास बाबर, मकरंद देशपांडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सागर वडगावे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आबांच्या आठवणींनी आ.डॉ. सुरेश खाडे भावूक-
कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण आमदार सुरेश खाडे यांच्या मनोगतात अनुभवायला मिळाला. पद्मश्री डॉ. अशोक (आबा) खाडे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासातील आठवणींना उजाळा देताना त्यांचा कंठ दाटून आला. “माझ्या पोटातील भुकेची आग भागवण्यासाठी आबा स्वतःच्या ताटातील चपाती मला द्यायचे. मोठा भाऊ म्हणून त्यांनी आयुष्यभर माझ्यावर मायेची सावली धरली. त्याग, कष्ट आणि प्रेम यामुळेच आज आम्ही या उंचीपर्यंत पोहोचलो आहोत,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांच्या या भावनिक आठवणींमुळे सभागृह काही क्षण स्तब्ध झाले. उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले, तर टाळ्यांच्या कडकडाटात सभागृहाने आबांच्या त्यागमय जीवनाला आणि कर्तृत्वाला मानवंदना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *