सामाजिक उपक्रमांनी बाबासाहेब आळतेकरांचा वाढदिवस साजरा
मिरज (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत व कौतुक करण्यात आले.
यानिमित्त मिरज हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात इयत्ता नववी व दहावीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब आळतेकर यांच्या शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करत, समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी केलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून राबविण्यात येणाऱ्या त्यांच्या उपक्रमांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेवक गणेशदादा माळी, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक दयानंद खोत तसेच मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्येही गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. विनोद परमशेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. विकास पाटील, प्रभात हेटकाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
बाबासाहेब आळतेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमांमुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भवितव्याला बळ देण्याचा हा प्रयत्न समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत आणि कौतुक होत आहे.


