निपाणी परिसरात दूधगंगा,वेदगंगा पात्राबाहेर ः 5 बंधारे पाण्याखाली,निपाणी तलावात 1 फुटाने वाढ

0
nipani pur

निपाणी,ता.05(प्रतिनिधी)-
गेेल्या 4 दिवसापासुन सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी परिसरात वेदगंगा व दूधगंगा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत.त्यामुळे आज रविवारी तालुक्यातील 5 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.यामध्ये कारदगा-भोज,बारवाड-कुन्नूर,जत्राट-भिवशी, कुर्ली-चिखली व भोजवाडी-कुन्नूर(खडकोळ) या बंधाऱ्यांचा समावेश आहे.पावसाचा जोर आणखी वाढत राहील्यास अकोळ-सिदनाळ बंधाराही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सदर बंधारे पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बॅरीगेटस लावून बंद केली असून वाहतूक अन्य मार्गाने वळविली आहे.तर निपाणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नेहरू जलाशयात शिरगुप्पी ओढयाचा प्रवास काल शनिवारी रात्रीपासून सुरू झाल्याने तलावाची पाणी पातळी 1 फुटाने वाढली आहे.
यंदा रोहिणी आणि मृग नक्षत्रात पाऊस झाला नव्हता.त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते.आर्द्रातही 12 दिवस उघडीप राहिल्याने खरीप हंगाम महिनाभर लांबला.त्यामुळे फक्त 30 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली होती.उरलेले 70 टक्के क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत होते.गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे आता सोयाबीन, मूग आणि उडीद यांच्या पेरणीला आणि टोकणणीला वेग येणार आहे.रयत संपर्क केंद्राने आधीच बियाण्यांचा पुरवठा केला आहे.संततधार पावसाने ओढ्या नाल्यांसह विहीरीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेता तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे.पुरग्रस्त गावांत स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत प्रशासानास लक्ष ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.पुरग्रस्तांसाठी तालुका प्रशासनाने 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.एकंदर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे.
निपाणी नेहरू जलाशयात एक फुट पाणी पातळी वाढली
गेल्या 2 दिवसांपासून निपाणी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचा मुख्य पाण्याचा स्रोत असलेल्या ऐतिहासिक जवाहर तलावाच्या पाणी पातळीत 1 फुटाने वाढ झाली आहे. तसेच, तलावाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या शिरगुप्पी ओढा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.या पावसामुळे निपाणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून संपूर्ण तलाव कधी ओव्हरफ्लो होतो, याची प्रतीक्षा शहरवासीयांना लागली आहे.
गेल्या 1 महिन्यापासन मान्सून पावसाने ओढ दिली होती.त्यामुळे शहरवासियांमध्ये चिंतेचे ढग दाटले होते.मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते.सध्या मान्सून सक्रिय झाल्याने डोंगराळ व सखल भागातून येणारे पाणी आता थेट जवाहर तलावात जमा होऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वी कोरडा पडू लागलेल्या या तलावात आता पाण्याचा साठा निर्माण झाला आहे.शिरगुप्पीचा ओढा काल रात्रीपासून वाहू लागल्याने नागरिक हे दृश्‍य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.गतवर्षी जून महिन्यातच तलाव ओव्हरफ्लो झाला होता.
जवाहर तलाव हा केवळ निपाणी शहराच्या सौंदर्यात भर घालत नाही, तर शहराची तहान भागविणारा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.यावर्षी जूनच्या प्रारंभी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तलावाने तळ गाठला होता, ज्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईची चिंता सतावत होती. मात्र,जुलैच्या सुरुवातीच्या काळात दमदार पावसाने तलावाची पातळी काही प्रमाणात वाढत आहे. तलाव लवकरच पूर्ण भरून ओसंडून वाहेल (ओव्हरफ्लो होईल), अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
तलावाची पाणी पातळी वाढल्याने आणि ओढा प्रवाहित झाल्याने केवळ शहरवासीयांसोबतच परिसरातील शेतकरी वर्गालाही मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *