मिरजेच्या तंतुवाद्य परंपरेचा जागतिक गौरव; मोहसीन मिरजकर यांना ‘स्टेट आर्टिसन एक्सलन्स अवॉर्ड’

0

मिरज (प्रतिनिधी)

मिरजेच्या दोनशे वर्षांहून अधिक समृद्ध तंतुवाद्य निर्मिती परंपरेला आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मिरजेचे कारागीर मोहसीन बाळासाहेब मिरजकर यांना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत ‘स्टेट आर्टिसन एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नवी मुंबई येथील सिडको भवनात झालेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या एमएसएमई (MSME) अंतर्गत २७ जून ‘जागतिक MSME दिन’ निमित्त परिसंवाद व विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कारागिरांचा गौरव करण्यात आला. यावेळी पुरस्कारार्थीना एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि माहिती पुस्तिका देऊन गौरविण्यात आले. राज्यातून प्राप्त झालेल्या २२२ अर्जापैकी ६०९ निकषांच्या छाननीनंतर अंतिम सहा उत्कृष्ट कारागिरांची निवड करण्यात आली. या मानाच्या पुरस्कारासाठी सांगली जिल्ह्यातून मिरजेतील तंतुवाद्य निर्माते मोहसीन मिरजकर यांची निवड झाली.

या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाच्या उद्योग व गुंतवणूक विभागाचे मुख्य सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे, अखिल भारतीय हस्तकला मंडळाचे प्रतिनिधी हलदर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारासाठी सांगली जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.

मोहसीन मिरजकर गेली २५ वर्षे तंतुवाद्य निर्मिती व वादन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध प्रकारची उच्च दर्जाची तंतुवाद्ये तयार केली आहेत. त्यांच्या हस्तकलेने साकारलेली वाद्ये भारतासह अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये निर्यात होत असून जागतिक स्तरावर त्यांना विशेष मागणी आहे. विशेष म्हणजे, मिरजकर कुटुंब गेल्या सात पिढ्यांपासून, म्हणजेच सुमारे २०० वर्षापासून, तंतुवाद्य निर्मितीची समृद्ध परंपरा जपत आहे. मोहसीन मियांना मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा नाही, तर मिरजेच्या ऐतिहासिक तंतुवाद्य उद्योगाच्या गुणवत्तेचा आणि परंपरेचा ही गौरव मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *