प्रधानमंत्री आवास अंतर्गत ‘गोखले इन्फ्रा’तर्फे उभारलेल्या गृहप्रकल्पाचे शनिवारी हस्तांतरण

मिरजेतील या भव्य प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत हस्तांतर
मिरज (प्रतिनिधी)
प्रधानमंत्री आवास योजना सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांतर्गत उभारलेल्या मिरजेतील भिमपलास टॉवर्स या गृहप्रकल्पाचे आज दि.१५ मार्च रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हस्तांतरण होणार आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली, खा. विशाल पाटील, आ. सुधीरदादा गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सायं.७ वा. या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरजेतील गोखले इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने हा गृहप्रकल्प उभारला असून या संस्थेचे संचालक विनायक गोखले यांनी याबाबत माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी देशातील शहरी भागातील अल्प व अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजना खाजगी भागीदारी योजना जाहीर केली होती. हा प्रकल्प खाजगी भागीदारी भागीदारीत राबविला गेला असून ज्यांचे उत्पन्न ३ लाखाच्या आत आहे आणि ज्यांचे पक्के घर नाही अशा व्यक्ती या प्रकल्पात लाभार्थी आहेत. त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा एकमेव प्रकल्प आहे.
ते पुढे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी म्हणून गोखले इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड या संस्थेने हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पामध्ये एकूण १८१ सदनिका असून पंतप्रधानांनी सुरू केलेल्या या प्रकल्पामध्ये गोखले इन्फ्रा डेव्हलपर्सने खारीचा वाटा उचलला आहे. येथील सदनिकांच्या किंमतीमध्येच अतिरिक्त दोन वर्षांचा देखभाल खर्च गोखले इन्फ्रा डेव्हलपर्सने लाभार्थ्यांना दिला आहे. हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर दोन वेळेस आलेल्या कोविड साथीवर मात करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. यामध्ये त्यांना तत्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे ही त्यांनी सांगितले.