आष्टा बैलगाडी शर्यतीत आदत गटात धनाजी ढोले यांची बैलजोडी प्रथम

आष्टा-प्रतिनिधी/डॉ.तानाजी टकले
आष्टा येथे “आप्पा” ग्रुपच्यावतीने आयोजित बैलगाडी शर्यतीत आदत गटात धनाजी जानकास ढोले यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकवला त्यांना माजी मंत्री आ जयंत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, सरपंच हिम्मत पाटील, किरण पाटील, सागर सिद्ध, चैतन्य ढोले (सावकर) युवा नेते अमित ढोले, बिटू पाटील, प्राचार्य विशाल शिंदे प्रमुख उपस्थित होते. कारंदवाडी व आष्टा येथील आप्प्पा प्रेमिंच्या वतीने बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा आदत, दुस्सा चौस्सा, ब गट, जनरल अ गट अशा चार गटात झाल्या.
आष्टा येथील नागाव रस्ता माळावर या स्पर्धा झाल्या. आदत गटात 15 गाड्यानी सहभाग घेतला. यामध्ये धनाजी ढोले यांच्या बुलेट राजा व किंग सर्जा या बैल जोडीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणें फेडीत प्रथम क्रमांकाचा “आप्पा प्रेमी आदत”किताब जिंकला. या गाडीत गाडीवान म्हणून हिंदकेसरी गाडीवान दादा वगरे होते. द्वितीय क्रमांक नितिन महाराज जत व यांनी पटकवला. तर तृतीय क्रमांक बबलू बस्तवडे यांनी पटकवला.
आष्टा येथील स्व जानकास ढोले व पै पांडुरंग ढोले यांच्या बैलजोडीने महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील शेकडो हिंदीकेसरी मैदाने जिंकली आहेत. पै पांडुरंग ढोले – धनाजी ढोले यांची हिंद केसरी हाणम्या -बैजा बैलजोडी लाखो शर्यत शौकी्नांच्या गळ्यातील ताईत होती. हिंद केसरी हाणम्या बैलाने सांगली जिल्ह्यातील लाखो रुपये बक्षीसांची नामांकित मैदाणे जिंकली. तर कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा, मुरगूड, नागाव,यड्राव,उचगाव, हुपरी, कागल, राशिवडे अशी एक लाखाची बक्षिसे जिंकली आहेत.तर कर्नाटक राज्यातील जगप्रसिद्ध नामांकित एकसंबा येथील शर्यतीत सलग तीन वर्षे तीन लाख, सव्वा लाख, लाख अशी बक्षिसांची हॅट्रिक साधलीआहे.
एकसंबा येथील मैदानात सलग तीन वर्षे नंबरात पळण्याचा विक्रम हाणम्या बैलाच्या नावावर आहे.याबरोबरच, कर्नाटकातील हणमापूर एक लाख,पट्टणकुडी, कंकणवाडी आडी, बेनाडी, बोरगाव, सदलगा, येथील लाखो रुपयांची मैदाने मारली आहेत. ढोले यांची तिसरी पिढी बैलगाडी शर्यती छंद जोपासत आहेत.