मिरज हायस्कूलतर्फे आनंदी गणेशोत्सव जनजागृती रॅली

मिरज (प्रतिनिधी)
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भव्य गणेशोत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरज शहरामध्ये डॉल्बी, लेझर नशामुक्त उत्सव होण्यासाठी रॅली काढण्यात आली. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त तथा पीएम श्री मिरज हायस्कूलच्या प्रशासक स्मृती पाटील यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने पीएम श्री मिरज हायस्कूल यांच्या पुढाकाराने तसेच पोलीस विभागाच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला.
मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारील प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण रासकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे तसेच दामिनी पथकाच्या महिला अधिकारी, पोलीस दिदी आणि पोलीस काका या उपक्रमांतर्गत कार्यरत अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि पीएम श्री मिरज हायस्कूलच्या पुढाकाराने प्रबोधनात्मक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
गणपती तलावापर्यंत ही रॅली काढण्यात आली. मिरजकरांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर उपक्रमाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पीएम श्री मिरज मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या रॅलीत विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक संचलनासह डॉल्बीमुक्त गणेशोत्सव- आनंदी गणेशोत्सव, नशेची गोळी करी जीवनाची होळी यासारख्या जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या, फलक दाखवले आणि जनजागृतीपर बॅनर्सद्वारे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवला. यामध्ये स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनखाली हायस्कूलचे ६०० विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले. यावेळी मिरज हायस्कूलला सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.