मिरजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १२ कोटींच्या निधीची मागणी

मिरज (प्रतिनिधी)
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व अभ्यासिकेसाठी १२ कोटीच्या निधीची मागणी विधानसभा उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे यांच्याकडे डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केली आहे. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये भव्य स्मारक , भव्यदिव्य नवीन पुतळा व अभ्यासिका उभारण्यासाठी १२ कोटी रुपये निधी मिळावा, यासाठी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष व पिंपरीचे आमदार ना. अण्णा बनसोडे यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात बौद्ध व बहुजन समाजाची मोठी लोकसंख्या असूनही गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मागील २० आरक्षित मतदारसंघातील आमदार यांनी प्रतिनिधित्व केले, मात्र त्यांनी बौद्ध समाजाच्या हितासाठी आवश्यक पायाभूत सुविधा किंवा स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता मिरज शहरातील डॉ. आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या आतील मोकळ्या जागेत जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक , नवीन पुतळा व अभ्यासिकेसह उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. ही अभ्यासिका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बहुजन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
तसेच मिरज तालुक्यातील सलगरे , आरग , बेडग , मालगाव व कवलापूर या गावांमध्ये नव्याने संविधान भवन बांधण्यासाठी व त्यामध्ये अभ्यासिका स्थापन करण्यासाठीही निधी मिळावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासारख्या सडेतोड आणि स्वाभिमानी व कार्यतत्पर नेतृत्वाखाली विधानसभा उपाध्यक्ष ना. अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास डॉ. महेशकुमार कांबळे यांनी व्यक्त केला आहे.