संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

0
548232559_18508480531067342_4764897309358136499_n

संकेश्वर (प्रतिनिधी) संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला दिसला.रविवार सुट्टीचा दिवस आणि उद्या सोमवार दि १५ रोजी निलगार गणपती विसर्जन असल्याने भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित दिसले.निलगार गणपती दर्शनासाठी हेद्दुरशेट्टी निवासस्थान ते थेट पोलीस स्थानका पर्यंत भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या दिसल्या.आज अलोट गर्दीत देखील लाखो भाविकांनी निलगार गणपती दर्शनाचा लाभ घेतला.भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता संकेश्वर पोलीस निरीक्षक शिवशरण अवजी यांनी गांधी चौक येथे पोलीस व्हॅन रस्ता मधोमध उभे करुन लोकांना पांगविण्याचे कार्य केले. त्यामुळे आझाद रस्ता,नदी गल्ली, मठ गल्ली नवी गल्ली आणि महालक्ष्मी मंदिर पटांगणावर लोकांची विशेष करुन महिलांची मोठी गर्दी झालेली दिसली.निलगार गणपतीचे प्रमुख शिवपूत्र हेद्दुरशेट्टी वीरभद्र हेद्दुरशेट्टी हनुमंत हेद्दुरशेट्टी तसेच हेद्दुरशेट्टी परिवारातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आले.त्याचा लाभ हजारो लोकांनी घेतला.महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांना पोलीसांनी रोखल्याने बऱ्याच लोकांना परतावे लागले.महालक्ष्मी मंदिर येथे गावातील युवा संघटनेने केलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारों लोकांनी घेतला.येथील जुना पी बी रस्ता, कमतनूर वेस, सुभाष रस्ता,आझाद रस्ता नदी गल्ली मठ गल्ली नवी गल्ली भाविकांनी फुलून गेलेली दिसली.          

   पोलीस यंत्रणा तोकडी पडली       

        निलगार गणपती दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने पोलीस यंत्रणा तोकडी पडलेली दिसली.हेद्दुरशेट्टी गल्ली -पाटील गल्ली अरुंद असल्याने भाविकाची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी संकेश्वर गोकाक चिकोडी आणि विजापूर येथून आलेल्या पोलीसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.                            

भाविकांना निलगार दर्शनाविना परतावे लागले.          

      नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी पुणे सातारा सांगली कोल्हापूर गडहिंग्लज बेळगाव हुबळी धारवाड हुक्केरी तसेच गोवा आंध्र प्रदेश राज्यातून आलेल्या बऱ्याच भक्तगणांना अलोट गर्दीमुळे निलगार गणपती दर्शनाविना गावाकडे परतावे लागले.कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिलांसाठी सुरू केलेली ( शक्ती योजना ) मोफत बस प्रवासाचा लाभ मुली महिला काॅलेज युवतींनी गेल्या १९ दिवसांत निलगार गणपती दर्शनासाठी पुरेपूर घेतलेला दिसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *