मूलभूत तंत्रशिक्षण व कौशल्य विकासातील संधी ओळखून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

शासकीय तंत्रनिकेतन, मिरजमध्ये डिजीटल सुविधा, सौर विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन
मिरज (प्रतिनिधी)
डिजीटल सुविधांच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील ज्ञानाचे भांडार प्राप्त करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होत असून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, रोजगार क्षमता व तंत्रज्ञानातील संशोधनात भर पडण्यास मदत होत आहे. तसेच उद्योगांच्या नव्या संधींचा शोध घेण्यास मदत होत आहे. भविष्यात मूलभूत तंत्रशिक्षण व कौशल्य विकासामध्ये अनेक संधी असून, ती ओळखून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कार्यान्वित सौर विद्युत प्रकल्प व अत्याधुनिक डिजिटल सुविधा प्रकल्पच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, तंत्रशिक्षणचे विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, प्राचार्य डॉ. संजय परदेशी, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कला, वाणिज्य शाखा जीवनात समृद्धी आणतात. मात्र, कौशल्य विकास आणि तंत्रशिक्षणाला जगात महत्त्व आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असून, विद्यार्थ्यांना आवश्यक उपकरणे, प्रयोगशाळा आणि नवकल्पनांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे शिक्षण घेऊन नवकल्पनांच्या माध्यमातून स्वामित्त्व हक्क घेऊन दैनंदिन जीवनात आवश्यक अनेक नाविन्यपूर्ण उत्पादनांची चलती आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील मूलभूत तंत्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारताला जागतिक महासत्ता बनवायचे आहे, हे सांगताना त्यांनी प्लास्टीकपासून इंधन, महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले छोटे रिंगरूपी यंत्र यांचे दाखले दिले.
उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक शुल्क माफीमुळे असे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्या पूर्वीपेक्षा जवळपास दुप्पट झाली आहे. मुलींनी स्टार्ट सुरू करण्यात भारत जगात पहिल्या स्थानी आहे. मूलभूत तंत्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या अनुषंगाने जपान देशातील सहा विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात येत असून, या माध्यमातून एक हजार विद्यार्थ्यांना तिथे राहून मोफत निवास, भोजनाच्या सुविधेसह अद्ययावत तंत्रशिक्षण घेता येणार आहे. हे शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी भविष्यात नवसर्जनशीलतेने संशोधन करावे, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिमोटची कळ दाबून महाविद्यालयातील डिजिटल सुविधा प्रकल्पाचे तसेच कोनशीला अनावरण करून सौर विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाची पाहणी मान्यवरांनी केली. प्रास्ताविकात डॉ. दत्तात्रय जाधव यांनी सौर विद्युत प्रकल्प व अत्याधुनिक डिजिटल सुविधा प्रकल्पांमुळे होणारे फायदे विषय करत या प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. प्रारंभी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले. सरस्वतीपूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांना अद्ययावत डिजीटल सुविधा उपलब्ध
संस्थेतील शैक्षणिक वातावरण आल्हाददायक असावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्च तंत्रनिकेतनांमध्ये फेस लिफ्टींग प्रोजेक्ट सुरू केले असून यातून संस्थेतील सर्व इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. सदर प्रकल्प पुढील २-३ महिन्यात पूर्ण होईल. तसेच संस्थेतील वातावरण सुरक्षित असावे, यासाठी संपूर्ण संस्था परिसर CCTV च्या निगराणी मध्ये आणण्यासाठीचा प्रकल्प देखील पूर्ण करण्यात आला आहे.
महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०) नुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांच्यात तांत्रिक ज्ञानाबरोबर औद्योगिक कौशल्ये, आर्थिक बाबी, पर्यावरण संतुलन व उच्च नीतिमूल्ये बिंबविणे आवश्यक आहे. यासाठी वर्गखोली व प्रयोगशाळेतील शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. त्यामुळे ऑनलाईन डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. यासाठी अत्याधुनिक डिजीटल सुविधा या संस्थेमध्ये स्थापित करण्यात आलेली आहे.
या सुविधेमध्ये प्रामुख्याने 24 Interactive LED Panels, 06 LCD Projector, 10 Laptops, 24 UPS, 40 Pen Drive, 22 Pointer, 02 Microphone with Speaker आणि 01 Digital Podium इत्यादी साहित्य उपलब्ध झाले आहे. या अत्याधुनिक सुविधामुळे Teaching Leaming Process ही कालानुरुप Updated इगलेली आहे. तसेच या सुविधांचा फायदा विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्ये वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील तसेच व्याख्याने, प्रात्यक्षिके, प्रकल्प, प्रणाली (Software) यांचा लाभ घेणे सुकर झाले. त्याचप्रमाणे शिक्षकांना देखील e-content, digital contant तयार करण्यात मोलाची मदत होत आहे.
सौर विद्युत प्रकल्पामुळे आर्थिक बचत
दुसरा महत्वाचा प्रकल्प म्हणजे “80 KW क्षमतेचा पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प असून यामुळे वर्षाला जवळजवळ ९८,१६० युनिट सौरऊर्जा निर्मिती होणार आहे. यामुळे वार्षिक अंदाजे ८ ते १० लाख इतकी आर्थिक बचत होण्यास मदत होईल. तसेच अंदाजे ८५ टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून या प्रकल्पाचे महत्व आहे.