उत्सव नवदुर्गांचा – सन्मान स्त्री शक्तीचा

एक कहानी – मोरेश्वर महिला बचत गटाची
कोल्हापूर.(प्रतिनिधी) नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्त्रीशक्तीची प्रत्यक्ष अनुभूती केवळ पूजेत नाही तर विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या माध्यमातूनही दिसून येते. शासन तसेच विविध विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांमुळे महिलांना न्याय, सन्मानाचा तसेच समानतेचा हक्क मिळतो आाहे त्याचबरोबर स्त्री पुरुष समानतेचा विचार प्रत्यक्षात दिसून येतो आहे. महिला सशक्तिकरण म्हणजे केवळ रोजगार अथवा शिक्षण नाही तर प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आत्मविश्वासाने उभे राहून यश संपादन करणे होय आजच्या काळात महिला शिक्षण, क्रीडा, कला, कृषी, उद्योग यामध्ये कार्यरत आहेत. याचबरोबर स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांची कितीही कष्ट करण्याची तयारी असते ही विशेष उल्लेखनीय बाब. आज अशाच एका कष्टाळू समुहाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आपल्या कुटुंबाचे नाव तर उज्वल केलेच परंतु समाजात सन्मानाचे स्थानही मिळवले आहे.
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील मोरेश्वर महिला बचत गटाचे 20 महिला सदस्य एकत्रित येत 2015 साली त्यांनी ‘मोरेश्वर ‘महिला बचत गटाची स्थापना केली. या बचत गटाद्वारे त्यांनी भाजीपाला, केक शॉप, नाष्टा सेंटर, भांडे दुकान आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम तसेच अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र – बालिंगा यांचे मोलाचे योगदान मिळाले. हा महिला बचत गट चालवण्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये कर्ज रुपाने घेतले तसेच यासाठी आवश्यक ते रीतसर प्रशिक्षण ही घेतले. या बचत गटातील अर्चना पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून सुमारे साडे सात लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेवून स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू केला. तो चांगला नावा रूपाला आणला. विश्वास बसणार नाही परंतु केवळ चिकाटी, सातत्य आणि जिद्द याच्या जोरावर त्या महिन्याकाठी तब्बल 25 ते 30 हजार रुपये इतका नफा मिळवतात. त्यांच्या या स्वतंत्र व्यवसायाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्याचबरोबर माविम व बालिंगा येथील अस्मिता केंद्राचे मोलाचे सहकार्य मिळाल्याची कृतज्ञ भावनाही श्रीमती अर्चना पाटील व्यक्त करतात.
श्रीमती अर्चना पाटील आणि त्यांच्या मोरेश्वर बचत गटाची ही कहाणी नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत साजरी होणाऱ्या नवदुर्गाच्या तेजस्वी रूपाची आठवण करून देते. त्यांचे कार्यकर्तृत्व आणि समर्पण हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. शारदीय नवरात्र हा उत्सव केवळ भक्तीचा नाही, तर स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. श्रीमती अर्चना पाटील यांच्यासारख्या नवदुर्गा आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला समृद्ध आणि सक्षम बनवत आहेत यात शंका नाही .