माजी जि. प.सदस्य विजय बोरगे यांच्या प्रयत्नातून बांबवडे आरोग्य केंद्राची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

विजय बोरगे
सरूड.(प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे परिसरातील वाड्या वस्तीवरील भागातील लोकांना आरोग्याची सुविधा मिळावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी बांबवडे येथे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी चार कोटी 75 लाख रुपये चा निधी आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी मिळवून दिल्यामुळे या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत तयार होऊन दीड वर्षे पूर्ण झाले त्यानंतर आतील फर्निचर साठी आरोग्य विभागाकडून दहा लाख रुपये मंजूर करून ती काम करण्यासाठी कामाची टेंडर काढून त्याला मंजुरी देऊन फर्निचर तयार करण्याचे काम दिले आहे पण अद्याप आरोग्य केंद्रात कोणतीही फर्निचर तयार झाले नसल्याने इमारत तयार होऊनही प्रशासनाच्या उदाशीनतेमुळे उद्घाटना अभावी धुळखात पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
शाहूवाडी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या वाड्या वस्तीवरील लोकांना आरोग्याची सुविधा घेण्यासाठी बांबवडे ही सोयीचे ठिकाण असल्याने या आरोग्य केंद्रात सुसज्ज असे असावे यासाठी ही इमारत उभी केली तसेच शाहूवाडी तालुक्यातील वाड्या वस्तीतील लोक मुंबई या ठिकाणी नोकरीस असल्याने गावाकडे कोणाचा मृत्यू झाल्यास मुंबईवरून इथेपर्यंत येईपर्यंत शव ठेवण्याची सुविधा कुठेही उपलब्ध नसल्याने विजय बोरगे यांनी वीस लाख रुपये खर्चून बांबवडे आरोग्य केंद्रात शवपेटीची सोय केली आहे. त्याचबरोबर बांबवडे परिसरातील सर्व प्राथमिक शाळेची दुरुस्तीचे काम करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
सध्या बांबवडे आरोग्य केंद्रात या परिसरातील उपचार घेण्यासाठी 50 ते 60 लोक रोज उपचार घेण्यासाठी येत असतात पण गेल्या दीड वर्षापासून येथे आरोग्य केंद्राची सुसज्य अशी इमारत उभी राहिली असतानाही शासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या जुन्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या राहण्याच्या ठिकाणी उपचार केला जात आहे. या अपुऱ्या जागेमुळे या आरोग्य केंद्रात सर्व सोयी असून देखील या नवीन इमारतीच्या उद्घाटना अभावी तुटपुंज्या जागीच उपचार घ्यावा लागत आहे. येथील अपु-या जागेमुळे काही रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आश्रय घ्यावा लागत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून या सुसज्य इमारतीत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या परिसरातील लोकांच्याकडून होऊ लागली आहे.