सराईत वाहनचोरटा गजाआड ; १६ लाख रु. किमतीची २२ वाहने जप्त

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई
सांगली (प्रतिनिधी)
कारसह दूचाकी वाहन चोरणाऱ्या सराईत वाहन चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सांगली पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चोरलेली सुमारे 16 लाख 10 हजार रुपये किमतीची 22 वाहने जप्त केली. फिरोज नबीलाल मुल्ला (वय 31, रा.मानुगडे गल्ली, जुळेवाडी, ता. तासगाव) असे या चोरट्याचे नाव आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून वाहनांची चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याने केलेले तब्बल 20 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
अधिक माहिती अशी कि, वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज पवार यांचे पथक वाहन चोरीतील सराईतांचा शोध घेत होते. तासगाव परिसरात पथक गस्तीवर असताना पथकातील पोलीस अंमलदार मच्छिंद्र बर्डे आणि सतीश माने यांना सराईत चोरटा फिरोज मुल्ला याच्या हालचालीबाबत माहिती मिळाली. त्याने काही दूचाकी चोरल्या असून त्या विक्री करण्यासाठी तासगाव-भिलवडी रोडवरील पाचवा मैल भागात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन फिरोज याला पकडले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दूचाकींच्या किल्ल्यांचा जुडगा सापडला. शिवाय त्याच्याकडे विनाक्रमांकाची दूचाकी होती.
अधिक चौकशीत त्याने पंधरा दिवसापूर्वी कुपवाड एमआयडीसीमधून दूचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने एकापठोपाठ 20 ठिकाणच्या गुन्ह्यांची कबुली देवून चोरलेली 22 वाहने पोलिसांच्या स्वाधीन केली. यामध्ये एका चारचाकी कारचाही समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच उत्तर कर्नाटकातील विविध ठिकाणहुन ही वाहने चोरी केलेली आहेत. चोरट्याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक पवार, हवालदार बर्डे, माने, अनिल कोळेकर,अमर नरळे,उदयसिंह माळी,महादेव नागणे,विक्रम खोत,केरुबा चव्हाण, गणेश शिंदे,अभिजीत पाटील, अजय पाटील,सागर लवटे,नागेश खरात, दरिबा बंडगर,सागर टिंगरे, संदीप नलावडे, संदीप गुरव, अमिरशा फकीर यांच्या पथकाने केली.