मिरज खून प्रकरणी तिघे ताब्यात मात्र मुख्य आरोपी अजूनही फरारी ; हीरोगिरीचा स्टेटस ठेवून पोलिसांना आवाहन !

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत पूर्व वैमनस्यातून निखिल विलास कलगुटगी (वय २६) याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्याची घटना घडली आहे. मिरज शहर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत. यापैकी एकास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मयत निखिल कलगुटगी याचा भाचा ऋषिकेश सचिन कलगुटगी (वय २१) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अजूनही फरार असून इंस्टाग्रामवर हीरोगिरीचा स्टेटस ठेवून पोलिसांना आवाहन दिल्याची चर्चा आहे.
पोलिसांनी या प्रकरणी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सर्फराज सय्यद, प्रतीक चव्हाण व अन्य तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी गतीने हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. यापैकी प्रतीक चव्हाण यास पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य दोघा अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या खून प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पूर्वी झालेल्या हल्ल्याच्या घटनेतून हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ऋषिकेश कलगुटगी याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तीन महिन्यांपूर्वी जमावाने त्याचा भाऊ रोहन याच्यावर हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मयत निखिल कलगुटगी याने ऋषिकेश कलगुटगी यास मदत केली होती. याचाच राग मनात धरून संबंधितांनी निखिल कलगुटगी याचा गणेश तलावाजवळ धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करून खून केला. पोलिसांनी या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अन्य हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.