स्थानिक स्वराज्य संस्थांत महायुतीकडे जास्त जागांची मागणी करणार – आ. विनय कोरे

प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या मार्गदर्शनात मिरजेत जनसुराज्य युवाशक्ती पक्षाचा मेळावा उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनसुराज्य युवाशक्ती पक्ष महायुतीसमवेतच असेल, ‘जनसुराज्य’ हा गुलालाचा पक्ष आहे, हे सांगलीने दाखवले आहे. त्याचे उदाहरण सांगली जिल्हा परिषदेत दिसून आले. दोन सदस्य असूनही सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सभापतिपद मिळवण्याचा मान ‘जनसुराज्य’ने मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांत महायुतीकडे जागांची मागणी करणार असल्याचे मत संस्थापक आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केले.
मिरजेत शाही दरबार हॉल येथे आयोजित जनसुराज्य युवाशक्ती पक्षाच्या राज्यस्तरीय युवाशक्ती सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष समित कदम, आमदार अशोकराव माने, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विशांत महापुरे, अमित कदम प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
विनय कोरे पुढे म्हणाले, ‘चार वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपने विचारधारा सोडून राज्य केले. ‘जनसुराज्य’मात्र कधीच आपला विचार सोडला नाही. पक्षाने स्थापनेपासून २० ते २१ वर्षांत राजकीय विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यापुढेही त्यात कधीच खंड पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष समित कदम म्हणाले, “जनसुराज्य युवकांपुढे एक आदर्श म्हणून नावारुपास येत आहे. अल्पावधीत पक्ष राज्यभर विस्तारतोय. त्या अनुषंगाने दरवर्षी नवरात्रीमध्ये मेळावा राज्यभर घेण्याची विनंती कोरे यांच्याकडे केली. त्यांची समर्थ साथ असल्यामुळेच तळागाळातील कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यात आम्हाला बळ मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकासाच्या प्रश्नाला प्राधान्य आहे. त्यांनी कायम विकासात्मक दृष्टिकोन ठेवला. नवरात्रत्सवात मेळावा ठेवला आहे. जनसुराज्यच्या विचारधारेशी मोठ्या प्रमाणात लोक जोडले जात आहेत. महानगरपालिकेत ९ ते १० नगरसेवकांपासून विजयाची सुरुवात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी, डॉ. महादेव कुरणे, माजी नगरसेवक आनंदा देवमाने, जयश्री कुरणे, डॉ. पंकज मेहेत्रे, भारत कुंडले, अमर पाटील आदी उपस्थित होते.