वाशी येथे बिरदेव-जोतिबा पालखी भेट सोहळा उत्साहात संपन्न

वाशी येथे बिरदेव-जोतिबा पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांचे गर्दी केली होती.
हळदी. (प्रतिनिधी) महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा या राज्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशी ग्रामदैवत श्रीक्षेत्र बिरदेव व दख्खनचा राजा जोतिबा यांच्या पालखी भेट सोहळ्याला अमाप उत्साहाची पर्वणी लाभली. ग्रामपंचायत प्रांगणामध्ये झालेल्या या सोहळ्यात चांगभलेंच्या घोषात कुंभ, लोकर, भंडारा व गुलालाची उधळण करत भाविकांनी आनंद व्यक्त केला.
मंगळवारी रात्री बिरदेव मंदिरात झालेल्या जागरणानिमित्त ढोल वादन, देवऋषी बिरदेव पुजारी यांची गादीवरील भाकणूक तसेच सूर्योदयापर्यंत शाहिरांच्या धनगर ओव्या सादर झाल्या. यावेळी हर्षवर्धन साळुंखे, मुरलीधर पाटील यांच्यासह बारा बलुतेदार मानकरी उपस्थित होते.
बुधवारी सकाळी ढोल-कैताळांचा गजर, छत्री, निशाण, अब्दागिरी व दिवट्यांच्या भारांसह पालखी सोहळा पायरीसमोरील सदरवर पोहोचला. यावेळी काशिनाथ बनकर यांच्यासह बनकर बांधवांनी हेडाम नृत्य सादर केले. देवस्थानचे प्रमुख मानकरी आण्णाप्पा पुजारी व भागोजी रानगे यांनी बिरदेव रुपी साक्षीने पुढील बारा वर्षांचे भविष्य कथन करणारी पारंपरिक भाकणूक केली.
यानंतर बिरदेव व जोतिबा पालखींचे ग्रामपंचायत प्रांगणामध्ये आगमन झाले. तलावातील स्नानानंतर दोन्ही पालखींच्या भेटीचा सोहळा कुंभ, लोकर, भंडारा व गुलालाच्या उधळणीत संपन्न झाला. “बिरदेव-जोतिबा” च्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले. या पारंपरिक सोहळ्यानंतर धनगर बांधवांना घरी नेऊन ग्रामस्थांनी बिरदेव नवरात्रीचा उपवास सोडला.
या कार्यक्रमास बबनराव रानगे, लक्ष्मण पुजारी, बिरू धनगर, युवराप्पा रानगे, आप्पासाहेब हजारे, ईराप्पा बनकर, बिरदेव काटकर, संभाजी लांडगे, बाळासो मगदूम, भगवान कुंभार, अनिल सुतार, तसेच चिखलीकर मानकरी, भाविक व वाशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.