गोकुळ’चे म्हैस दूध उत्पादन वाढवून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार

– मा.मंत्री हसन मुश्रीफ
गोकुळच्या दुधाचा दर्जा उत्तम; सुपरवायझर हे गोकुळ आणि दूध उत्पादक यांच्यातील मजबूत दुवा
कोल्हापूर, ( प्रतिनिधी) “गोकुळच्या दुधाची गुणवत्ता, चव आणि शुद्धता यामुळेच आज राज्यभर गोकुळच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. पुणे-मुंबईसह इतर महानगरांतील ग्राहक नेहमी सांगतात गोकुळच्या म्हैस दुधाचा दर्जा इतर म्हैस दूधापेक्षा उत्कृष्ट आहे. त्यामुळे या दर्जाचा सन्मान राखत अधिक उत्पादन आणि पुरवठा वाढवणे आपली सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या सहकाऱ्याने गोकुळचे म्हैस दूध उत्पादन वाढवून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार” असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मा. हसन मुश्रीफ यांनी केले.
गोकुळ दूध संघाच्या वतीने सुपरवायझर, महिला स्वयंसेविका तसेच सर्व विभाग प्रमुख यांची बैठक राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मा. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात पार पडली. यावेळी बोलताना म्हणाले कि, “मी स्वतः एक दूध उत्पादक शेतकरी आहे. दुग्ध व्यवसाय करताना ग्रामीण भागातील अडचणी जवळून अनुभवल्या आहेत. कोणतीही सहकारी संस्था मोठी व्हायची असेल, तर त्या संस्थेतील प्रत्येक घटकाने निष्ठेने आणि एकदिलाने काम केले पाहिजे. आपण ज्या संस्थेत काम करतो ती संस्था ‘एक नंबर’ व्हावी, हे आपले ध्येय असले पाहिजे,” असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
“गोकुळच्या ‘म्हैस’ दुधाला मुंबई-पुणे बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे. या दुधाची चव ग्राहकांच्या मनाला भावते. या गुणवत्तेचा टिकाव ठेवणे आणि त्या प्रमाणात दूध पुरवठा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गोकुळचे सुपरवायझर बंधू, स्वयंसेविका व सर्व घटकांनी मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. “सुपरवायझर हे गोकुळ आणि दूध उत्पादक यांच्यातील मुख्य दुवा आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील अल्पभूधारक व शेतमजूर वर्गातील दूध उत्पादकांना जातिवंत म्हैस खरेदीसाठी प्रोत्साहन द्यावे. केडीसीसी बँकेमार्फत कर्जपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. जिल्ह्यात दूधवाढीची क्षमता मर्यादित झाली असली तरी परराज्यातून जातिवंत म्हशी खरेदी करून उत्पादन वाढवणे आवश्यक आहे,” असे मा. मुश्रीफ म्हणाले. ते पुढे म्हणाले, “वासरू संगोपन योजना तसेच आय.व्ही.एफ. संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी गोकुळ प्रयत्नशील आहे. आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले, तर २० लाखांचा कलश पूजन करून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणे शक्य आहे. तसेच पुढील एक-दोन वर्षांत परराज्यातील १० हजार जातिवंत म्हैशी गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यात आणण्याचा मानस आहे.” सीमाभागातील म्हैस दूध संकलन वाढवण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत, तसेच प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुपरवायझरचा ‘लाडका सुपरवायझर’ म्हणून गौरव केला जाईल, अशी घोषणा मा. मुश्रीफ यांनी केली.
“स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या कष्टातून गोकुळची घडण झाली. त्यांच्या विचारांवर चालतच गोकुळ आज प्रगतीच्या मार्गावर आहे. गोकुळकडून उत्पादकांना वेळेवर दरफरकाची रक्कम व उत्तम दर मिळतात, म्हणूनच उत्पादकांचा गोकुळवरील विश्वास अढळ आहे. हा विश्वास टिकवणे हीच आपली प्राथमिक जबाबदारी आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व केडीडीसीसी बँकेचे कार्यकारी संचालक गोरख शिंदे यांनी संघामार्फत व बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या “म्हैस खरेदी योजने”बद्दल सविस्तर माहिती दिली. बैठकी दरम्यान दुग्ध व्यवसायातील आधुनिक संकल्पना, म्हैस दुधाच्या संकलन वाढीच्या संधी व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक रणजितसिंह पाटील यांनी केले. चेअरमन नविद मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले व मनोगत किसन चौगले यांनी केले तर आभार माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मा.नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के.डी.सी.सी बँकेचे संचालक राजेश पाटील, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.गोकुळ’चे म्हैस दूध उत्पादन वाढवून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार