जिल्ह्यात विमानतळ, क्रीडा संकुल व्हावी यासाठी प्रयत्नशील- समित कदम
मंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांना निवेदन देत लवकर कार्यवाही करण्याची केली मागणी
मिरज (प्रतिनिधी)
कवलापूर येथे कृषी उड्डाण योजनेअंतर्गत विमानतळ मंजूर करण्यात यावे तसेच जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र विकसित करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी आणि जिल्ह्यात नवीन क्रीडा संकुले उभारण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सहकार व नागरी उड्डाण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि युवक कल्याण व क्रीडा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना दिले. समित कदम यांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ आणि खडसे यांची भेट घेऊन या मागण्यांबाबत चर्चा केली.
मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कवलापूर येथील विमानतळ मंजुरीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जिल्ह्यात विमानतळ होणे महत्त्वाचे आहे. निर्यातक्षम द्राक्ष, बेदाणे, डाळिंब, पेरू इत्यादी शेतमाल निर्यात करण्यासाठी विमानतळ होणे गरजेचे आहे. त्या संदर्भात लवकरात लवकर केंद्रीय स्तरावर दिल्ली येथे बैठक बोलावून विमानतळ मंजुरीबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. कवलापूर येथे विमानतळासाठी जागा राखीव आहे. कृषी उड्डाण योजनेअंतर्गत या ठिकाणी विमानतळ मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी बरेच क्रीडाविषयक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी मुंबई किंवा दिल्ली येथे बैठक आयोजित करावी. जनसुराज्यचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी जिल्ह्यातील या दोन महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ आणि खडसे यांची भेट घेऊन चर्चा केली.