राज्याच्या विकासासाठी शासन व महाराष्ट्र चेंबर संयुक्तपणे प्रयत्नशील – मुख्यमंत्री फडणवीस

सांगली (प्रतिनिधी)
राज्यातील व्यापार, उद्योग आणि कृषी विकासासाठी शासन व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर एकत्रित प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे नुकत्याच झालेल्या भेटीत चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
या शिष्टमंडळामध्ये आमदार राहुल आवाडे, ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, संजय सोनवणे, शंकर शिंदे, श्रीकृष्ण परब, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ओमप्रकाश अग्रवाल व वेदांशू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.२०२७ मध्ये महाराष्ट्र चेंबरच्या शताब्दी वर्षानिमित्त ऐतिहासिक सोहळा राज्य शासन आणि चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने इन्व्हेस्टमेंट समित्या, कृषी विकास, उद्योगवृद्धी आणि व्यापारवाढीसाठी उपलब्ध योजनांचा प्रसार करण्याचे तसेच राज्यभर विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यात आले.
व्यापारी आणि दुकानदारांना २४ तास दुकाने सुरू ठेवण्यास शासनाने दिलेली परवानगी हा दूरदृष्टीपूर्ण निर्णय असल्याचे शिष्टमंडळाने नमूद करून शासनाचे आभार मानले.