वयोवृद्धाकडून सोन्याचा गोप हिसकावणारे तिघे गजाआड ; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

सांगली (प्रतिनिधी)
वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील एका वृद्धाच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने लंपास करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून सुमारे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रेम दिपक कांबळे (वय 21), तुषार शहाजी कांबळे (वय 19, दोघे रा. खोची फाटा, सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि आकाश प्रकाश टिबे (वय 22, रा. नाईकबा मंगल कार्यालयाजवळ, गोटखिंडी, ता. वाळवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, 29 सप्टेंबर रोजी सकाळी गोटखिंडी येथील भीमराव पाटील रस्त्यावरून चालत असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी वृद्धाच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून पळ काढला होता. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. तपासादरम्यान पथकाला माहिती मिळाली की काही तरुण चोरीचे दागिने विक्रीसाठी सांगलीवाडी टोलनाका परिसरात येणार आहेत. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गोटखिंडी येथील वृद्धाकडून दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांना आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, संदीप गुरव, अरुण पाटील, उदयसिंह माळी, अतुल माने, रणजीत जाधव, शिवाजी शिंदे, सुरज थोरात, रोहन घास्ते, पवन सदामते, संकेत कानडे, अभिजीत माळकर, अशोक जाधव तसेच सायबर पोलीस ठाण्याचे करण परदेशी, अभिजीत पाटील आणि अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.