आमदार विनय कोरेंच्या वाढदिवसानिमित्त नांदेड पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत

मिरज (प्रतिनिधी)
नांदेड येथील पूरग्रस्तांना जनसुराज्य शक्ती पक्षाने मदतीचा हात दिला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याने भरलेला आयशर ट्रक रवाना करण्यात आला.
नांदेड येथे अलीकडे आलेल्या भीषण पूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक घरांबरोबरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही वाहून गेले आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष पुढे सरसावला आहे. या ट्रकमध्ये स्कूल बॅग, पाण्याचे जार, वह्या आदी शालेय साहित्याचा समावेश असून हे साहित्य जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात देण्यासाठी नांदेडकडे पाठविण्यात आले.
हा उपक्रम जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कोणत्याही आपत्तीच्या वेळी जनसुराज्य शक्ती पक्ष नेहमी मदतीसाठी पुढे असतो, आणि पुढेही राहील,” असा विश्वास समित कदम यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते डॉ. महादेव अण्णा कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. पंकज म्हेत्रे, नाना घोरपडे, शहराध्यक्ष योगेश दरवंदर, जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, समीर मालगावे, अल्ताफ रोहिले, ताहीर शेख, अशरफ मनेर, जैन समाजाचे भालचंद्र पाटील, कीर्ती कुमार सावळवाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.