भाषेच्या विकासासाठी सार्वजनिक प्रयत्न आवश्यक : डॉ. विनोद कांबळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) भाषेचा विकास त्या भाषक समाजावर अवलंबून असतो. आज जरी मराठी भाषिक समूहाची संख्या वाढत असली तरी ही केवळ संख्यात्मक वाढ आहे. मराठीच्या गुणात्मक वाढीस अजून म्हणावी इतकी सुरुवात झालेली नाही. त्यासाठी सार्वजनिक पातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत. असे मत डॉ. विनोद कांबळे यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे महाविद्यालयाचा मराठी विभाग व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते. ह्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले होते.
आजची भाषा हे वेगळीच भाषा आहे. विशेषतः तरुणांच्या तोंडी आपण भाषेची जी रूपे पाहतो आहे. ती विंगलीस रूपे म्हणावी लागतील. मोबाईल आणि समाजमाध्यमे यामुळे आजच्या भाषेचे काय होणार असाही प्रश्न सतावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाषा टिकण्यासाठी भाषेचा वापर वाढवायला हवा त्याचा एक भाग म्हणून आपण सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी ग्रंथालये उभारायला हवेत. असा उपायही त्यांनी सूचविला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात आपण आपल्या भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत तर आपल्या भाषेच्या मृत्यूसाठी आपणच कारणीभूत ठरू शकतो. त्यासाठी भाषेच्या बाबतीत सजग राहुयात. असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रो. डॉ. एम. बी. देसाई, ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण, सर्व विभागाचे विभागप्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचे स्वागत प्रा. डॉ. ए. पी. उबाळे यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. बी. एम. मगदूम यांनी व आभारप्रदर्शन प्रा. के. आर. पाटील यांनी केले.