मिरज दंगल प्रकरणी पोलीस सतर्क; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सांगली पोलीस मुख्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न
मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत मंगळवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली आहे. बेकायदा जमाव जमविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात ३५ जण निष्पन्न झाले असून १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शांतता समितीची बैठक घेऊन अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिला. आ. सुरेश खाडे, आ. नायकवडी तसेच शांतता समितीचे सदस्य यांच्यात झालेल्या बैठकीत मिरजेतील स्थिती बाबत चर्चा झाली.
ते म्हणाले, “मिरजेत दोन मित्रांमध्ये मंगळवारी शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून दोन गट समोरासमोर आले. पोलिस ठाण्यासमोर बेकायदा जमाव जमला होता. या प्रकरणात पोलिसांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई केली आहे. तसेच बेकायदा जमाव जमवून जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत ३५ संशयित आरोपी निष्पन्न झाले असून १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.”
ते पुढे म्हणाले, “मिरजेत झालेल्या वादानंतर अनेकांना नेमकी घटना माहीत नव्हती. अर्धवट माहितीच्या आधारे काहीजण एकत्र आले. त्यांनी बेकायदा जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. वादानंतर गाड्यांची तोडफोड झाल्याची कोणतीही माहिती पोलिसांपर्यंत आलेली नाही. मात्र एका फलकाचा चोळामोळा करण्यात आला. त्या फलकावर कोणतीही धार्मिक नोंद नव्हती. त्यामुळे या प्रकरणावरून कोणीही अफवा पसरवू नये. अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता समिती आणि नागरिकांनी सहकार्य करावे.”
आ. सुरेश खाडे म्हणाले, शहरातील शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आणि तत्पर आहे. वेळेवर हस्तक्षेप करून तणाव अधिक वाढू न दिल्याबद्दल स्थानिक पोलीस प्रशासनाचे देखील मी कौतुक करतो मात्र नशेखोरी बाबत सक्त पावले उचलली जाणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
या बैठकीस अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपअधीक्षक विमला एम., उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आदी उपस्थित होते. डिजिटल फलक उभारताना पोलिस विभागाचा ‘ना हरकत दाखला’ (NOC) आवश्यक करावा, यासाठी महापालिका प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. वादग्रस्त फलक उभारले जाणार नाहीत आणि विद्रुपीकरण होणार नाही यासाठी पोलिस व महापालिका प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार असून परस्पर समन्वय राखण्यात येईल. वादानंतर मिरजेत विविध अफवा पसरल्या होत्या.