स्व. शंकर पाटील यांचे मराठी साहित्य आजही वाचनीय – डॉ. प्रकाश पाटील

मिरज (प्रतिनिधी)
सत्तर-ऐंशीच्या दशकात आपल्या असामान्य लेखणीद्वारे ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन घडविणारे ज्येष्ठ साहित्यिक स्व. शंकर पाटील यांनी मराठी साहित्यात एक वेगळा ठसा उमटविला, असे प्रतिपादन लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालय, मिरजचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी केले.
मराठी विभागात आयोजित “अभिजात मराठी भाषा सप्ताह” कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना त्यांनी सांगितले की, स्व. शंकर पाटील यांच्या कथा ग्रामीण जीवनातील रांगडेपणा आणि वास्तव यांचे जिवंत चित्रण करतात. ‘मिटिंग’, ‘धिंड’, ‘नाटक’, ‘पाहुणचार’ या कथा आजही वाचकांना ताज्या वाटतात. त्यांच्या कथाकथनाची वेगळी धाटणी सर्व समाजघटकांना भावली. त्यांनी ‘पिंजरा’, ‘पाहुणी’, ‘एक गाव बारा भानगडी’ यांसारख्या चित्रपटांना पटकथा व संवाद देत मराठी चित्रपटसृष्टीतही मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. बी. गायकवाड होते. प्रारंभी स्व. शंकर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. अविनाश भोरे यांनी जन्मशताब्दी उपक्रमांची रूपरेषा सांगितली, तर प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी प्रास्ताविक केले व सूत्रसंचालनही केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. प्रशांत भंडारे व प्रा. विशाल घोरपडे यांनी केले. कला व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.