न्यू कॉलेजमध्ये “ग्रंथालयाची संशोधनात भूमिका” या विषयावर कार्यशाळा संपन्न
न्यू कॉलेजमध्ये “ग्रंथालयाची संशोधनात भूमिका” या विषयावर कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर.(प्रतिनिधी) न्यू कॉलेज, कोल्हापूर यांच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापठ अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत “ग्रंथालयाची संशोधनात भूमिका” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा्चे उद्घाटन व अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी भूषविले. संशोधनाची नवी दिशा आणि ज्ञानप्रसारात ग्रंथालयाची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे बीजभाषण व पहिल्या सत्राचे मार्गदर्शन प्रा. डॉ. एस. बी. पाटील, विभागप्रमुख, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी केले. त्यांनी “Empowering Research Through Open Educational Resources (OER)” या विषयावर बोलताना म्हटले की, मुक्त शैक्षणिक साधनांनी (OER) संशोधनाला नवीन दिशा मिळत असून जागतिक ज्ञान विनिमयाला चालना मिळत आहे. संशोधकांनी पारंपरिक संसाधनांबरोबरच ओपन ऍक्सेस साधनांचा वापर करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या सत्रात प्रा. टी. एल. कांबळे यांनी “संशोधनात ग्रंथपालांची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रंथपाल हे केवळ पुस्तक व्यवस्थापक नसून संशोधन सल्लागार, माहिती मार्गदर्शक आणि ज्ञान व्यवस्थापक आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. माहिती साक्षरता (Information Literacy) आणि शैक्षणिक प्रामाणिकता (Academic Integrity) या दोन संकल्पना संशोधनात मूलभूत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तृतीय सत्रात प्रा. डॉ. युवराज जाधव यांनी “Basic Concepts of Research” या विषयावर सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले. संशोधनाची व्याख्या, उद्दिष्टे, समस्या निवड, गृहीतक मांडणी, संशोधन पद्धती आणि निष्कर्ष प्रस्तुतीकरण या टप्प्यांची माहिती त्यांनी उदाहरणांसहित स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. पी. आडाव यांनी केले. त्यांनी संशोधन संस्कृती दृढ करण्यासाठी ग्रंथालये सक्षम माहिती केंद्र म्हणून विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अरविंद घोडके यांनी केले. प्रा. डॉ. निलेश पवार प्रा. डॉ. अनिल सूर्यवंशी प्रा. डॉ. संदीप जाधव प्रा. के.डी. कांबळे यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले.
या कार्यशाळेला कोल्हापूर शहरातील विविध महाविद्यालयांमधील ग्रंथपाल, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.


