सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धेला प्रारंभ.
कणेरी मठाच्या पावन वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना आणि स्पर्धात्मकतेचा उत्सव
कोल्हापूर. (प्रतिनिधी) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ या भव्य स्पर्धांचा समारोप उत्साहात झाला. या स्पर्धा १० व ११ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाच्या पावन सानिध्यात प्रारंभ झाला.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन श्री, सिद्धगिरी महासंस्थान मठाचे ४९ वे मठाधिपती परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि राज्याचे आरोग्य मंत्रीतथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते झाले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर अतिथींचा सत्कार आणि स्वागत समारंभ पार पडला.
या प्रसंगी डॉ. देवेंद्र पाटील, राजकुमार पाटील, एम. डी. पाटील, विजय सनगर, यशोवर्धन बारामतीकर, गुंडोपंत वड, विवेक शेट्ये, निशांत पाटील तसेच राज्यातील विविध वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की,“क्रीडा ही केवळ विजय मिळवण्यासाठी नसून शिस्त, मेहनत आणि संघभावना शिकवणारी जीवनशैली आहे. डॉक्टर आणि नर्सिंग विद्यार्थ्यांनी आरोग्य टिकवण्यासाठी खेळ आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा.”
दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये अॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, भालाफेक, उंचउडी अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागांमधील वैद्यकीय आणि नर्सिंग संस्थांतील विद्यार्थी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाले आहेत.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले, तर डॉ. वर्षा पाटील यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या जल्लोषपूर्ण उपस्थितीत विविध क्रीडा प्रकारांना सुरुवात झाली आणि संपूर्ण परिसर क्रीडामय उत्साहाने भरून गेला.


