अभिषेक निषादची कर्नल सी. के. नायडूट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघात निवड.
कोल्हापूरच्या क्रिकेट प्रतिभेचा राष्ट्रीय स्तरावर पुन्हा गौरव
कोल्हापूर. (प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा प्रतिभावान गोलंदाज अभिषेक निषाद याची कर्नल सी. के. नायडू ट्रॉफीसाठी २३ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा चारदिवसीय साखळी पद्धतीने पार पडणार असून, सामने १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र, सौराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, त्रिपुरा, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश आणि दिल्ली या राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत.
अभिषेक निषादने यापूर्वीही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
सन २०१७-१८ मध्ये १४ वर्षांखालील, तर २०१९-२० मध्ये १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघात त्याची निवड झाली होती. तसेच कुचबिहार ट्रॉफी (१९ वर्षांखालील) स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना अभिषेकने केवळ ७ सामन्यांत ४४ विकेट्स घेत भारतातील अव्वल गोलंदाज म्हणून स्थान मिळवले होते.
या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) कॅम्पसाठी निवड झाली होती. विशेष म्हणजे, या कॅम्पसाठी निवड होणारा अभिषेक निषाद हा कोल्हापूरचा पहिला खेळाडू ठरला होता.
अभिषेकने १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघातून विनू मांकड ट्रॉफी स्पर्धेत सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल बीसीसीआयमार्फत सन २०२१-२२ साठी दिला जाणारा “एम. ए. चिदंबरम पुरस्कार” त्याला प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार भारतीय क्रिकेट संघातील ऑलराउंडर रविंद्र जडेजा यांच्या हस्ते देण्यात आला होता.


