दारफळ ग्रामस्थांच्या मदतीसाठी आरे गावाचा पुढाकार
आरे. ता.करवीर या ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तू, 51 हजार मदत देऊन मदतीचा हात देताना माजी सरपंच सागरा पाटील व इतर
हळदी.(प्रतिनिधी) 2019 च्या महापुरात आरे (ता. करवीर) या गावाला मोठा तडाखा बसला होता. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्या कठीण काळात माढा तालुक्यातील दारफळ या गावाने मदतीचा हात पुढे करत आरे गावाला आर्थिक व जीवनावश्यक मदत पुरवली होती. त्यावेळी दाखवलेली मानवीयता आज आरे ग्रामस्थांनी विसरली नाही.
अलीकडेच सीना नदीला आलेल्या पुराने माढा तालुक्यातील दारफळ गावातील अनेक घरांचे नुकसान झाले, संसार उघड्यावर पडले. या संकटाच्या काळात दारफळ ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहत आरे गावाने पुन्हा एकदा माणुसकीचे उदाहरण घालून दिले. गावकऱ्यांच्या पुढाकारातून दारफळ ग्रामस्थांना ₹५१ हजार रोख रक्कम, एक टन चारा, आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली.
आरे ग्रामस्थांनी “आपल्यावर संकट आले तेव्हा दारफळकरांनी आधार दिला; आता त्यांच्यावर ओढवलेल्या संकटात मदत करणे हे आपले कर्तव्य आहे” अशा भावना व्यक्त केल्या. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दारफळ व आरे गावांमधील या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे दोन्ही गावांनी मानवी संवेदनांचा सुंदर आदर्श घालून दिला आहे.यावेळी मा सरपंच सागर पाटील , विकास मोहिते, अविनाश पाटील, प्रमोद देवकर, मानसिंग पाटील, विकास पाटील, अमर पाटील, हरी पाटील, वीरेंद्र मोहिते, शुभम चौगले , समर्थ मोहिते आरे गावातील युवा वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.


