हज यात्रेकरूंना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मदनी ट्रस्टची मागणी

0
WhatsApp Image 2025-10-14 at 7.43.50 PM

हज कमिटीच्या मुख्याधिकाऱ्यांची घेतली मुंबईत भेट

सांगली (प्रतिनिधी)
सांगली येथील मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी हज यात्रेकरूंना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शहांनवाज सी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी मुंबईतील हज हाऊसमध्ये शहांनवाज सी. यांची भेट घेऊन काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.

त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हज कमिटीचे शासकीय कार्यालय स्थापन करावे, तालुकानिहाय मेळावे घेऊन यात्रेकरूंना मार्गदर्शन करणाऱ्या हज इन्स्पेक्टर व ट्रेनर यांची नियुक्ती करावी, इन्स्पेक्टरकडे संपूर्ण माहिती असावी आणि त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात यावी, मेडिकल ऑफिसर व स्टाफ शासनाकडून न घेता, यात्रेकरूंची सेवा भावनेने करणारे कर्मचारी नेमावेत, हज कमिटीने ‘रियाल’ देण्याची बंद केलेली पद्धत पुन्हा सुरू करावी, यात्रेकरूंना भोजनाची सोय कमिटीमार्फत करून द्यावी, दरवर्षी महाराष्ट्रातून हजारो मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जातात त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ट्रस्टकडून नमूद करण्यात आले.

शहांनवाज सी. यांनी शिष्टमंडळाशी संवाद साधताना सांगितले की, मी स्वतः हजला जाऊन यात्रेकरूंना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या असून, त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. २०२५ च्या मागील हज यात्रेदरम्यान उद्भवलेल्या अडचणींवर शहांनवाज यांनी तत्काळ कारवाई केल्याबद्दल मदनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच, सादर केलेल्या निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *