कोल्हापूर-राधानगरी मार्गावर कोथळी बस थांब्यावर अपघातात वृद्ध ठार
कोल्हापूर-राधानगरी मार्गावर कोथळी बस थांब्यावर अपघातात वृद्ध ठार
हळदी, प्रतिनिधी कोल्हापूर-राधानगरी राज्य मार्गावरील कोथळी (ता. करवीर) येथील एस.टी. स्टँडसमोर शनिवारी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात वाशी (ता. करवीर) येथील विठ्ठल कृष्णात लांडगे (वय ७०) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. दिवाळी सणानिमित्त पाहुण्यांच्या गावी कोथळी येथे आलेल्या लांडगे यांना, रात्री रस्ता ओलांडताना भोगावतीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एस.टी. बसने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आणि पुढील तपास सुरू केला आहे.या मार्गावर आठवड्याभरात कौलव आणि कोथळी येथे झालेला हा तिसरा मोठा अपघात आहे. अपघातांची वाढती मालिका पाहता, वारंवार होणारे अपघात थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने वेगमर्यादा आणि वाहतूक नियंत्रणाची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


