अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

0
अवकाळी मुळे भातशेतीचे नुकसान

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे जिल्हयातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून भात, भाजीपाला, सोयाबीन आणि फळपिकांवर याचा गंभीर परिणाम झाला आहे, जिल्हयाच्या पूर्वभागातील बहुंताशी तालुक्यात सद्या भात, भुईमुगाच्या शेंगा तसेच सोयाबीन काढणीचा हंगाम चालू असल्याने अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पीकांच्या हानीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.

      गेल्या मे महिन्याच्या मध्यापासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबायचे नांव घेईना झाला आहे, पावसाळयात किमान चार ते पाच वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती, सततच्या संततधार पावसामुळे पीकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाल्याची मत अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत. ऑक्टोबरप्रारंभी काही काळ पावसाने उघडीप घेतल्याने पीकांची चांगली वाढ झाली व काही पीके काढणीला आली, सध्या भात व शेंगा काढणीचा हंगाम जोमात असतांना अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारंबळा उडाली आहे. अनेक तालुक्यात पावसाने अचानक हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे भात शेतातच झडू लागले आहे तर भुईमुगाच्या शेंगांना वारंवारच्या पावसामुळे शेतातच कोंब येऊ लागले आहेत. मुळात ग्रामीण भागात शेतीकामासाठी मजुर मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती असून आता शेतीकामे घरच्या माणसांनाच करावी लागत आहेत, त्यातच निसर्गाचा असा फटका बसल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

      सततच्या मुसळधार पावसामुळे पिके झोडपली गेली असून भाताबरोबरच फुलकोबी, कोबी, मिरची, वांगी यांसारख्या भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान होऊ लागले आहे.  वांगी, मिरची, टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये सड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे पुढील पेरणीस अडथळा निर्माण झाला आहे. दिवाळीच्या काळात विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजल्यामुळे आर्थिक नुकसान आणि सणाच्या आनंदावरही पाणी पडले आहे.  ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत चिंताजनक आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरी हवालदिल झाला आह.

        जिल्हयाच्या पश्चिम भागातील शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा अशा डोंगराळ व दुर्गम  पट्टयात  भातशेती हे मुख्य पीक आहे. अवकाळीच्या पावसाने या भागात मोठा फटका बसला आहे.  परतीच्या पावसामुळे कापणीस तयार असलेली भातशेती भिजली आणि त्याबरोबर  सडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे यंदा शेतीपीकांच्या उत्पादनात घट आणि गुणवत्तेवर परिणाम झाला.

      अगोदरच वन्य प्राण्यांचा त्रास, वन्य प्रान्यांकडून नुकसानीचा सामना दररोज शेतकऱ्यांना करावा लागत आहे, वन्यप्राण्याच्या तोंडून काही शिल्लक राहिलेले पिक पदरात पडेल अशी अपेक्षा असताना पुन्हा  पावसामुळे जंगलातील प्राणी शेतात शिरले आणि पिकांचे नुकसान केले. स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे नुकसान झालेल्या शेतीपीकांच्या भरपाईची मागणी होऊ लागली आहे. आर्थिक नुकसान आणि मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. परतीच्या पावसाचा धुमाकूळ असल्यामुळे आणि त्यामध्येच निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मदत मिळेल का, याबाबत शेतकऱ्यांकडून शंका व्यक्त होऊ लागली आहे. 

       पिकांच्या काढणिपासून ते चांगल्या पध्दतीने वाळवून घरापर्यंत घेवून जाणे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये परतीच्या पावसाने अडथळा निर्माण होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण आहे. स्थानिक प्रशासन आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासकीय हालचाली वेगाने घडव्यात हीच माफक अपेक्षा सध्या शेतकरी करत आहेत 

“ परतीच्या पावसामुळे शेतक-यांची दयनीय अवस्था झाली आहे, हातातोंडाशी आलेले पिक वाया जात आहे, हे बघून वाईट वाटते शासनही शेतक-यांची फारशी दखल घेत नाही, अशी खंत शाहुवाडी तालुक्यातील शिंपे गावचे शेतकरी माणिकराज पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *