कोल्हापूर शिक्षण विभागात स्त्रीशक्तीचा डंका
कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शिक्षण विभागातील सर्व प्रमुख पदांवर सध्या महिला अधिकारी कार्यरत असून, ही कोल्हापूरच्या शिक्षण इतिहासातील पहिलीच वेळ आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एक योगायोग घडला आहे.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या प्रभारी कुलगुरुपदी ज्योती जाधव (बाटे), शिक्षण उपसंचालक (कोल्हापूर विभाग) म्हणून प्रभावती कोळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (योजना) म्हणून अनुराधा म्हेत्रे, तसेच शिक्षण संचालक सहायक (कोल्हापूर विभाग) पदाचा प्रभारी कार्यभार यांच्याकडे आहे. वसुंधरा कदम यांच्याकडे प्राथमिक वेतन पथक अधीक्षक पदाचा प्रभारी कार्यभार आहे. ही स्त्रीशक्तीजबाबदारी पार पाडत आहेत. या अधिकारी पदावरून अत्यंत कार्यक्षमतेने, निष्ठेने आणि संवेदनशीलतेने काम करत आहेत.
सर्व महिला अधिकारी कर्तृत्वाने सिद्ध करत आहेत की नेतृत्व म्हणजे फक्त पद नव्हे, तर संवेदनशीलतेची ताकद आणि कार्यतत्परतेचा आदर्श आहे. हा क्षण केवळ कोल्हापूरसाठीच नव्हे, तर राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे शिक्षणप्रेमींनी सांगितले.चौकट…जिल्ह्यात प्रथमच शिक्षण विभागात नेतृत्व महिलांकडे असल्याचा हा अभिमानास्पद योग स्त्रीशक्तीचा सन्मान ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेला नवे बळ, नवी दिशा आणि नवचैतन्य लाभत आहे. स्त्रीशक्तीचा हा उन्नत गौरव म्हणजे शिक्षणातील समर्पण, शिस्त आणि संवेदना यांचा सुंदर संगम. कोल्हापुरात स्त्रीशक्तीने इतिहास घडवला आहे आणि हा इतिहास प्रेरणेचा दीप बनून उजळत राहील. यात काही शंका नाही.असे मत जगदीश शिर्के,राज्य उपाध्यक्ष, (महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ) यांनी मांडले.


