सांगली विभागीय मैदानी स्पर्धेत पी. व्ही. पी. महाविद्यालयाचे उत्तुंग यश
कवठेमहांकाळ प्रतिनिधी
बळवंत महाविद्यालय, विटा येथे दिनांक 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आयोजित सांगली विभागीय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धेत पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, कवठेमहांकाळच्या खेळाडूंनी उल्लेखनीय आणि सर्वांगीण कामगिरी करून स्पर्धास्थळी उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत भालाफेकमध्ये अनुष्का शिर्के हिने उत्कृष्ट तंत्र, स्थिर मनोवृत्ती आणि अचूक फेक यांच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले हातोडाफेक स्पर्धेत अमृता भोसले हिने ताकद, कौशल्य आणि सातत्य यांचा विलक्षण संगम साधत प्रथम क्रमांक मिळवत आपली सरसत्ता सिद्ध केली; तर गोलफेक स्पर्धेत स्वप्नाली शिंदे हिने प्रभावी फेकीसह तृतीय क्रमांक मिळवत पदकतालिकेत स्थान मिळवले. संघात्मक स्पर्धेतही पी. व्ही. पी. महाविद्यालयाच्या खेळाडूंनी तितकाच उत्साह दाखवत मिक्स रिले स्पर्धेत हर्षवर्धन माने, आदित्य माने, अथर्व कांबळे, अनुराधा कदम ,पूजा माळी व सानिका यादव यांच्या संघाने अचूक समन्वय, जलद वेग आणि शेवटपर्यंत झुंज देण्याच्या वृत्तीमुळे चुरशीच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या कामगिरीत आणखी भर घातली.
या सर्व उल्लेखनीय प्रदर्शनांमुळे महाविद्यालयातील सर्व खेळाडूंची शिवाजी विद्यापीठस्तरीय आंतर-विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांच्या पुढील प्रवासासाठी हे यश अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. या कामगिरीमागे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मयुर शिंदे व शारीरिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक निखिल सूर्यवंशी यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि आनंद करिअर अकॅडमीचे प्रशिक्षक प्रमोद पाटील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष मा. सुरेश पाटील, सचिव सुदर्शन शिंदे, प्रभारी प्राचार्य डॉ. जी. डी. कोरे, माजी प्राचार्य डॉ. एम. के. पाटील, उपप्राचार्य प्रा. धनपाल यादव आणि माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शिंदे यांनी खेळाडूंना सतत प्रोत्साहन देत त्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.


