वंदे मातरम या मूलमंत्राचे स्मरण ठेवून जगात भारताचे नाव उज्ज्वल करावे:- जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली,प्रतिनिधी
वंदे मातरम हे केवळ गीत नसून ते देशप्रेमाची अखंड ज्योत आहे. स्वातंत्र्यलढ्यात या समरगीताने स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देत महत्त्वाची भूमिका बजावली. आजच्या विद्यार्थ्यांनी व तरूणांनी वंदे मातरम या गीतापासून प्रेरणा घेऊन देशभक्तीची कायम जाणिव ठेवत भारताचे नाव जगात उज्ज्वल करावे व या माध्यमातून मातृभूमीला वंदन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी रचित ‘वंदे मातरम’ या गीत रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सांगली हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, मिरजचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, सहाय्यक कौशल्य विकास अधिकारी दत्तात्रय देवळे आणि गीता शेंडगे, सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. डी. बिरनाळे आदि उपस्थित होते.यावेळी सांगली हायस्कूलच्या मैदानावर जवळपास 2500 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आपली मातृभूमी श्रेष्ठ असून, त्याचे वर्णन वंदे मातरम् या गानातून केले आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. देशातील तरूणांच्या ओठावर कोणते गीत आहे, त्यावर देशाचे भविष्य अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले उद्दिष्ट उच्च पराकोटीचे ठेवून वंदे मातरमचे स्मरण करत मातृभूमीचे नाव उज्ज्वल करावे, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि मनन या त्रिसूत्रीच्या जोरावर आपल्या आवडीच्या क्षेत्रात भविष्य घडवा. मात्र, मोठे होताना वंदे मातरम हा आपला मूलमंत्र असल्याचे स्मरणात ठेवावे. या गीताने प्रेरित होऊन प्रत्येक विद्यार्थ्याने भारतभूमीला वंदन करून तिचे नाव जगात मोठे करूया, असा निश्चय आजच्या या दिवशी करावा, असे ते म्हणाले. तसेच, वैयक्तिक व शाळेची स्वच्छता ठेवावी आणि अंमली पदार्थापासून दूर राहण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी श्री. काकडे यांनी वंदे मातरम गीत गायनासोबतच वंदे मातरम या गीताचे आपल्या राष्ट्रीय लढ्यातील महत्त्व प्रतिपादित केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने नियोजन करण्यात आलेला हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रोत्साहनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य एम. डी. जोशी मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी गड किल्ले संवर्धन समितीचे अक्षय रेपे व भूषण गुरव, माधवनगरच्या सरपंच अंजू तोरो, स्वयंसेवा संस्था प्रतिनिधी ज्योती सूर्यवंशी आणि मोहन वाटवे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदस्य अविनाश यादवाडे, आयएमसी सदस्य सतीश सावंत आणि एम. सी. कांबळे आदि उपस्थित होते. संयोजन गटनिदेशक एस. के. गोसावी यांनी केले. यावेळी एस. जी. घाग, निरंजन परमणे, गटनिदेशक संतोष गुरव आणि एम. ए. पाटील, प्रकाश पत्की, प्रमुख लिपिक शहाजीराजे पाटील, नितीन चाटी तसेच कार्यालयीन अधीक्षक एन. डी. पाटील व आर. व्ही. माळी व औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगलीचे सर्व कर्मचारी तसेच राणी सरस्वती हायस्कूल, दडगे हायस्कूल, सांगली हायस्कूल चंपाबेन कॉलेज, गुजराती हायस्कूल येथील विद्यार्थी व स्टाफ उपस्थित होते


