भारतीय हॉकी दिनानिमित्त कोल्हापूरात रॅली

0
हॉकी शताब्दी दिन रॅलीचे उद्घाटन करताना ज्येष्ठ हॉकी खेळाडू

कोल्हापूर (प्रतिनिधी) भारतीय हॉकी परंपरेला 100 वर्षे पुर्ण होत आहेत. या दिनाचे औचित्य साधून दि हॉकी कोल्हापूर, दि डिस्ट्रीक्ट हॉकी असोशिएशन, कोल्हापूर जिल्हयातील सर्व हॉकी क्रीडामंडळे, हॉकी प्रशाला व ज्येष्ठ खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

      हॉकीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाईन बाजार येथील भगव्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून रॅलीचे उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्वलनाने ज्येष्ठ खेळाडूंच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रॅली लाईन बाजार येथील सर्व परिसरात फिरुन क्रीडांगणावर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली मध्ये सर्व क्रीडामंडळाचे ज्युनिअर, सिनीयर खेळाडू मुले सहभागी होते.

        यानंतर मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर “हॉकी शताब्दी चषक” ज्युनिअर मुले व मुलींची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मुलांच्यात कोल्हापूर टायगर्सने कोल्हापूर इलेव्हनचा 2-0 ने पराभव तर मुलींच्यात कोल्हापूर इलेव्हनने खेलो इंडिया मिनी सेंटर, नुलचा टायब्रेकरवर 4-2 ने पराभव करून या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. हे विजयी गोल मुलांच्यात वॉरियर्सच्या यश कांबळे व जय धडाम यांनी नोंदवले तर मुलींच्यात श्रुतिका पाटील, मधुरा भोसले, साक्षी गोसावी व सिद्धी चौगले तर नुलच्या लक्ष्मी जाधव व हर्षदा पोवार यांनी नोंदवले.

      या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात कोल्हापूरच्या हॉकीला वैभवशाली परंपरा असून ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य देवू. तसेच खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी भौतिक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देवू असे सांगितले.

      या दोन्ही कार्यक्रमांना म्हणजेच रॅली व स्पर्धेला हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ. सुरेखा पाटील, माजी राष्ट्रीय महिला खेळाडू रेखा इंगवले, इ. खेळाडू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भारतीय हॉकी परंपरेचा इतिहास मोहन भांडवले यांनी करुन दिला तर कोल्हापूर हॉकी परंपरेविषयी माहिती विजय पाटील यांनी सांगितली.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *