महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या मिरज केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात
पहिल्याच दिवशी ‘अखेरचा सवाल’ या नाटकास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिरज (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या मिरज केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा आज बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज येथे उत्साहात पार पडला. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मनपा उपायुक्त स्मृती पाटील, अखिल भारतीय नाट्य परिषद सांगलीचे अध्यक्ष भास्कर ताम्हणकर, नाट्य परिषद उपशाखा सांगलीचे अध्यक्ष विनय देशपांडे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र फलटणकर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा १२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान दररोज संध्याकाळी ७ वाजता पार पडणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड परिसरातील विविध नाट्यसंस्था या स्पर्धेत सहभागी होत असून, रंगभूमीवर चुरस पाहायला मिळणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी आरोग्य भारती संस्थेच्या वतीने, प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि विश्राम लोमटे दिग्दर्शित ‘अखेरचा सवाल’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला आणि नाट्यसंस्कृतीला भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रमाचे समन्वयक संजय रुपलग हे असून सहाय्यक समन्वयक राजेंद्र नातू तर सूत्रसंचालन कविता बगलकोटे यांनी केले. परीक्षक म्हणून रामकृष्ण पार्टे, शोभा बोल्ली आणि वनराज कुमकर लाभले. मिरजमध्ये रंगभूमीच्या परंपरेला नवचैतन्य देणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक हौशी कलाकारांना आपले कलागुण सादर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.


