कवठेमहांकाळमध्ये कोंगनोळीच्या युवकावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला
आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून पकडले
सांगली (प्रतिनिधी)
कवठेमहांकाळ शहरात मंगळवारी रात्री कोंगनोळी येथील एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे हा हल्ला पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर झाला. सदर तरुणाच्या घरातील महिला त्या ठिकाणी उपस्थित असल्याने त्यांनी आरडाओरड केली, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखून आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणात एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील मोसिन दस्तगीर जमादार (वय ३७) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांनीच फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आठ संशयितांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी कि, ११ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ मन्सूर, त्याची पत्नी साईशा, फिर्यादीची पत्नी करिष्मा, तसेच राहुल कांबळे आणि त्याची पत्नी अनिशा हे सलगरे येथे झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी फॉर्च्युनर कारमधून कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी कार उपकोषागार कार्यालयासमोर उभी केली होती. फिर्यादीचा भाऊ आणि इतर जण पोलीस ठाण्यात गेले असताना मोसिन जमादार हे बाहेर थांबले होते. त्याचवेळी अतुल जगन्नाथ कांबळे (रा. कोंगनोळी) यांच्या सांगण्यावरून रवी खत्री, प्रदीप मोरे, लोकेश नाईक, महादेव भंडारी, सोमनाथ डवरी, साहिल डफेदार, सत्तार महात आणि अतुल कांबळे हे दोन आणि चारचाकी वाहनातून घटनास्थळी आले.
फिर्यादीने अतुल कांबळेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आल्याचे समजल्यावर आरोपी संतापले. त्यानंतर रवी खत्री व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीवर हल्ला चढविला. सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोकेश नाईक, महादेव भंडारी आणि सोमनाथ डवरी यांनी फिर्यादीचे हात पकडून ठेवले. या वेळी रवी खत्री आणि प्रदीप मोरे यांनी कमरेतील चाकू बाहेर काढत “हा आता जिवंत राहू नये” असे म्हणत मोसिन जमादार यांच्या पोटात आणि बरगडीजवळ चाकूने भोसकून गंभीर जखमी केले.
जखमी मोसिन जमादार यांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.


