संख्याशास्त्र – प्रत्येक क्षेत्राचा आधारस्तंभ :-प्रा. दिपाली पाटील

0
IMG_20251114_112052

कवठेमहांकाळ प्रतिनिधी

     पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागात बी.एस्सी. भाग-दोनच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना संख्याशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी नुकतेच प्रेरणादायी अतिथि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका सौ. दिपाली पाटील यांनी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात पुणे विद्यापीठाचे माजी संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल गोरे यांच्या ‘संख्याशास्त्राची उपयुक्तता’ सांगणाऱ्या कवितेच्या श्रवणाने झाली, ज्यामुळे सभागृहात ज्ञानाची आणि प्रेरणेची लहर पसरली.यावेळी प्रा. सौ.  पाटील यांनी  “संख्याशास्त्र – प्रत्येक क्षेत्राचा आधारस्तंभ” या विषयावर सखोल विवेचन करताना विज्ञान, वैद्यक, सामाजिक सर्वेक्षण, अर्थशास्त्र, तसेच धोरणनिर्मिती या विविध क्षेत्रांतील संख्याशास्त्राच्या उपयुक्ततेचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना संख्याशास्त्रामध्ये करियर घडविण्याचे आवाहन करत ‘डेटा म्हणजे केवळ आकडे नसून, निर्णयक्षमतेचा पाया आहे,’ असे सांगत प्रेरणादायी विचार मांडले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नव्याने नियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ. जी. डी. कोरे हे होते. त्यांच्या शुभहस्ते प्रा. सौ.  पाटील यांचा पुष्पगुच्छ आणि महाविद्यालयाचे वार्षिक प्रकाशन ‘वसंत’ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात डॉ. कोरे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक व तांत्रिक सुविधा पूर्ण क्षमतेने वापरण्याचे आवाहन केले. तसेच नियमित अभ्यास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वानुशासन यांच्या बळावर महाविद्यालयाचा लौकिक उंचवावा, असे त्यांनी प्रतिपादन केले.प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. विजय कोष्टी यांनी करून दिला. त्यांनी अतिथि व्याख्यानाचे उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांदरम्यान अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांची गरज अधोरेखित केली.प्रा. सौ. शितल पाटील-कदम यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. गणेश सातपुते यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी डॉ. अण्णासाहेब सूर्यवंशी, प्रा. कु. स्नेहल झरेकर, तसेच बी.एस्सी. भाग-दोन व भाग-तीनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *