मिरजेत रोपवायर कुलुपाचा फास लागून मुलाचा मृत्यू

0
IMG-20251118-WA0015

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत एका १४ वर्षे वयाच्या बालकाला खेळताना रोप वायर चा गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील दर्गामाता मंदीर पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली. येथे राहणारा अमोल संजय मळवाडे (वय १४) या बालकाचा मृत्यू झाला आहे. सायकलला लावण्यासाठी असलेला रोपवायर कुलपाचा फास लागून बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहिती अशी की, अमोल मळवाडे हा इयत्ता नववीत शिकत होता. आई- वडील मोलमजुरी करतात. अमोल हा शाळेतून आल्यानंतर दुपारी क्लासला जाणार होता. त्याचे मित्रही त्याला क्लाससाठी बोलवायला आले होते. घरात किराणा दुकानातील साहित्य आणण्यासाठी अमोल गेला होता. दुकानातून आल्यानंतर घरातून दप्तर घेवून क्लासला जाणार होता. अमोल घरी दप्तर आणण्यासाठी गेला. मात्र तो क्लासला आला नाही. यामुळे त्याचे मित्र त्याला बोलवायला घरी गेले. मित्रानी त्यास बाहेरून हाक दिली. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही.

शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी घरात जावून पाहिले असता अमोल यास वायररोप लॉकचा लोखंडी जिन्याला फास लागल्याचे आढळून आले. खेळत असताना त्याच्या गळ्याला फास लागला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वायर लॉक जिन्याला बंद होऊन गळफास लागला आहे. लोखंडी वायररोप ग्राईडरने कापून काढण्यात आला. तातडीने बालकास शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अमोलच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या आईने हंबरडा फोडला होता. वडलांना आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *