ऊसतोड कामगारांच्या झोपडपट्टीत जाऊन आरोग्य तपासणी व लशीकरण मोहीम
सरूड प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तृत्य उपक्रम
बांबवडे (प्रतिनिधी) सध्या ऊस तोड हंगाम जोरात सुरू आहे. शाहूवाडी, शिराळा परीसरातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करण्यासाठी परराज्यातून मोठ्या प्रमाणात ऊस तोड मजूर या भागात ऊस तोडणी हंगामात येत असतात. बोचरी थंडी, राहण्यासाठी कच्चा झोपड्या, अपु-या पोषाखातील लहान मुले,त्यांची योग्य पोषण आहार याकडे झालेले दुर्लक्ष, वयो वृध्द लोक यांच्या आरोग्याची काळजी घेणे, आरोग्य सुरक्षित ठेवणे या उद्देशाने खामकरवाडी परिसरातील सरूड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत आरोग्य तपासणी व लशीकरण मोहीम राबवण्यात आली. ऊसतोड मजुरांच्या झोपडपट्टीत जाऊन प्रत्यक्ष ठिकाणी सर्वेक्षण, तपासणी व उपचार देण्याचे काम आरोग्य विभागाच्या पथकाने केले.
या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र सरूड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जगताप, राहुल वाघमारे, आरोग्य सहाय्यक आर. एम. पाटील, आरोग्य सहाय्यिका मेघा मस्के, आरोग्य सेविका सुजाता लाखन, औषध निर्माण अधिकारी रुतुजा परिट, गटप्रवर्तक पूजा लाड, तसेच आशा स्वयंसेविका आणि वाहन चालक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
मजुरांच्या आरोग्याची नियमित तपासणी, लसीकरण, गर्भवती महिलांची तपासणी, बालकांचे वजन मापन, सर्दी-खोकला, ताप आदी आजारांची तपासणी तसेच आवश्यक त्या औषधोपचारांची सुविधा झोपडपट्टीतच उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांना वेळेवर व तात्काळ आरोग्यसेवा मिळाली असून या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. सरूड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने अशा उपक्रमांमुळे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होत असल्याचे सांगितले आहे.


