कोल्हापूरच्या भक्तीचा पदकांचा चौकार, तर संस्कृती पाटीलने ज्युदोत कांस्य
भक्ती वाडकर १ रौप्य 3 कांस्य, सोबत संस्कृती पाटील ज्युदोतील महिलांच्या ७८ किलो वजनी गटात कांस्य
कोल्हापूर.ता.29 (प्रतिनिधी) खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतील पाचव्या पर्वात कोल्हापूरच्या मुलींची मक्तेदारी दिसून आली. राधानगरीतील हमालाची मुलगी असणाऱ्या भक्ती वाडकरने ४ पदकाची लयलूट केली आहे तर घरात कुस्तीचा वारसा असणाऱ्या संस्कृती पाटीलने ज्युदोत कांस्य पदकाची कमाई करीत दिवस गाजविला.
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पुणे, शिवाजी विद्यापीठीच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम आहे. या यशात महाराष्ट्राची मुलींनी पदकाची बाजी मारली आहे. जलतरणा तलावातही महाराष्ट्राच्या मुलींनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कडून खेळताना कोल्हापूरच्या भक्ती वाडकरनेही १ रौप्य 3 कास्य पदकाचा चौकार झळकविला. तिचे वडिल राहूल वाडकर हे कोल्हापूरमधील राधानगरी शासकीय धान्य गोदाम या हमालाची नोकरी करतात. भक्तीने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रूपेरी यश संपादन केल्यानंतर २०० मीटर बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाईल व मिडले रिले शर्यतीत कांस्य पदकाची कमाई केली. शासनाच्या पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी ती कसून सराव करीत असते. गत आसामधील स्पर्धेत 1 सुवर्ण 3 रौप्य 1 कांस्य अशी पाच पदकाची कमाई भक्तीने केली होती.
कोल्हापूरतील शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृती पाटीलने ज्युदोतील महिलांच्या ७८ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे. सलग दोन लढतीत गुजरात, पंजाबच्या खेळाडूंना पराभव करीत उपांत्य फेरीत मजल मारली होती. कांस्य पदकाच्या लढतीत चंदिगडच्या अनूला पराभूत करीत संस्कृतीने पर्दापणातच पदकाचा करिश्मा घडविला. कोल्हापूरतील पन्हाळा मधील कोतोली गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील यांची संस्कृती ही कन्या असून तिचे आजोबा मारुती पाटील व चुलते अरूण पाटील कुस्तीगीर होते. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत ती सराव करत असते. घरात कुस्तीचा वारसा असताना तिने कुस्ती सोडल्यानंतर ज्युदो खेळात चकमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले.


