चांदोली राष्ट्रीय उद्यानात ताडोबातील दुसरी वाघीण दाखल

0
WhatsApp Image 2025-12-10 at 1.53.10 PM

आँपरेशन तारा अंतर्गत कामगिरी, चांदोलीत सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलिज

शित्तूर-वारुण (शिवाजी नांगरे) सह्याद्री वाघ पुनर्स्थापन कार्यक्रम महाराष्ट्र वन विभाग ऑपरेशन तारा  या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र वन विभागाने आज सायंकाळी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली दोन वर्षांची वाघीण T7-S2 हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलिज करण्यात आले. ही वाघीण ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आली होती. त्यांनंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

     डॉ. रविकांत खोब्रागडे,पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) व प्रमुख – रॅपिड रेस्क्यू टीम, ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केलेल्या तपासणीत वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी व स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आले.सॉफ्ट रिलिज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते. यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते. सदर संपूर्ण कार्यवाही भारतीय वन्यजीव संस्थेच्या (WII) वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.

डॉ. के. रमेश, वरिष्ठ वैज्ञानिक, WII तसेच श्री आकाश पाटील, फील्ड बायोलॉजिस्ट, WII वाघीणीच्या अनुकूलन प्रक्रियेचे व वर्तणुकीचे शास्त्रीय निरीक्षण करीत आहेत.राष्ट्रीय पातळीवर या कार्यक्रमाचे निरीक्षण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) करीत असून, या मोहिमेवर डॉ. नंदकिशोर काळे – सहाय्यक निरीक्षक (प्रोजेक्ट टायगर) व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे विशेष लक्ष आहे.

      वाघीणीची सुरक्षित पकड, वाहतूक आणि सॉफ्ट रिलिजची संपूर्ण प्रक्रिया ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीम व कोलारा कोअर रेंजमधील क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे यशस्वीपणे पार पडली. ही संपूर्ण क्षेत्रीय कार्यवाही ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) यांच्या संयुक्त पथकांद्वारे राबविण्यात येत असून, या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), मुंबई–डॉ. जितेंद्र रामगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *