सांगा आम्ही जगायचं कसं?भयभीत रहिवाश्यांचा वनविभागाला संतप्त सवाल.
शित्तूर-वारुण लोकवस्ती जवळ चंदा वाघिणीचे दर्शन
शित्तूर-वारुण (शिवाजी नांगरे) चांदोली राष्ट्रीय उद्यानात वनविभागाकडून ताडोबातून आणलेल्या चंदा वाघिणीला कोर झोन मध्ये सोडण्यात आले होते. ती कोरमधुन बफर मध्ये आली, आता तर तिने आपला मोर्चा चक्क प्रादेशिक मधील शित्तूर- वारुण पैकी तळीचा धनगर वाडा इथे वळवल्याने नागरिकात भीतीचे आणि दहशतीचे चित्र निर्माण झाले असून घराबाहेरही पडणे मुश्किल झाले आहे.
परिसरात वाघीण फिरत असल्यामुळे वाडी-वस्तीवरच्या लहान-मोठया मुलांच्या शाळेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी तळीच्या वाड्यावर चंदा आल्याचे समजताच वाडी-वस्ती वरील विद्यार्थीनी सुट्टी घेत घरी बसने पसंद केले आहे. चंदा वाघीण ही सात ते आठ दिवसांपूर्वी उदगीरीच्या पठारावर, मलकापूर- उदगिरी मुख्य रस्त्यावर दिसून आली होती. अंबाईवाडा इथेही ती दिसून आली, या ठिकाणी एका शेतकऱ्याचे रेडकू गायब झाले होते त्याची शोधाशोध करण्यासाठी वन विभागाने त्याला त्या ठिकाणी मज्जाव केला व जनावरे सोडण्यात येऊ नये असे सागण्यात आले. त्यामुळे सर्व नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे. आज तिने आपला मोर्चा तळीचा धनगर वाडा या परिरात वळविला आहे. तळीचा वाडा, विठ्ठलाई वाडा, कदम वाडी, ढवळेवाडी, पेगुवाडा, राघू वाडा ह्या सगळ्या वस्त्या अगदी चांदोली राष्ट्रीय उद्यानाला लागूनच आहेत.
वनविभागाकडून सोडण्यात आलेल्या वाघिणी संदर्भात या लोकांच्या मध्ये वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्यात आलेली नाही. पर्यटन विकसित व्हावे या दृष्टीने सोडण्यात आलेल्या वाघासारख्या हिंस्त्र प्राण्यांबद्दल इथल्या लोकांमध्ये भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संबधीत वनविभागाने गांभीर्याने पाहून त्याबद्दल जनजागृती करावी अशी मागणी इथल्या रहिवाशी मधून केली जात आहे. वनविभाग मात्र याबाबत काहीच उपाय-योजना करत असल्याचे दिसून येतं नाही.


