अग्रण धुळगावचा नाविन्यपूर्ण उपक्रम “अभ्यासाचा भोंगा”
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून व्यक्त केले समाधान
सांगली प्रतिनिधी
कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे राबविण्यात येत असलेल्या “अभ्यासाचा भोंगा” या उपक्रमाची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने राबविल्या जात असलेल्या या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करत सर्व गावांनी अशा सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले.
अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संकल्पनेतील अभ्यासाचा भोंगा या उपक्रमांतर्गत पहाटे ५ ते ७ आणि सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निश्चित वेळ दिली जाते. या वेळेत गावात सायरन (भोंगा) वाजविण्यात येतो आणि सर्व घरांमधील टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचे पालन ग्रामस्थांकडून केले जाते. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची नियमितता निर्माण होऊन शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी व्यक्त केला.
कोविड-१९ काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या मोबाईलच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला. व्यापक जनजागृतीनंतर गावकऱ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सकाळ-सायंकाळ निश्चित दोन तास शांत वातावरणात विद्यार्थी अभ्यास करत आहेत. कुटुंबीयांमधील संवाद वाढण्यासही या उपक्रमाने हातभार लावला आहे.
या पाहणीदरम्यान मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अर्चना कापसे, प्रभारी गटविकास अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी उल्हास भांगे, सरपंच शिवदास भोसले, उपसरपंच भारती चौगुले, मुख्याध्यापक गोपाळ कनप, ग्रामविकास अधिकारी अंकुश डवणे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
गावातील शैक्षणिक वातावरण अधिक बळकट करण्यासाठी ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय कायम राहावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी गावातील काही भागात घरोघरी भेट देऊन मुलांशी, ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे भेट दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्हीडिओ कॉलव्दारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, अग्रण धुळगाव गावातील आजी व माजी सैनिकांनीही या उपक्रमास हातभार लावला आहे. गावातील प्रत्येक शिक्षकांनीही 30 ते 40 घरे वाटून घेतली आहेत. ते दररोज मुलांच्या घरी भेट देऊन ते अभ्यास करतात का याची पाहणी करून त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवितात. शैक्षणिक पर्यटन असलेले हे पहिले गाव पाहिले आहे. सर्वांनी या गावास भेट देऊन त्याची सत्यता पहावी असे सांगून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, आजी व माजी सैनिक या सर्वांचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले. हा उपक्रम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात जावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


