कोल्हापूर वीरशैव समाज संघटनेचा आदर्श घेण्यासारखा- प्रा. रमेश आवटे
राज्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम
कोल्हापूर. ता. 25 (प्रतिनिधी) – कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाज संघटनेने विविध सामाजिक कार्यक्रम राबवल्याबरोबरच औद्योगिक, व्यापार, शिक्षण, कला, क्रीडा आदी क्षेत्रात मिळवलेले यश हे आदर्शवत असून रुद्रभूमि परिसराचे केलेले नंदनवन, सुशोभित परिसर आदि बाबी विचारात घेऊन या संघटनेस प्रथम क्रमांक देण्यात आल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे या राज्य वीरशैव समाजाच्या शिखर संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेश आवटे यांनी केले.
सप्तशृंगी, वणी (नाशिक ) येथे झालेल्या राज्य वीरशैव समाज संघटनेच्या वार्षिक सभा व विविध पुरस्कार वितरण समारंभात ते अध्यक्ष स्थानावर बोलत होते. उपाध्यक्ष व उद्योजक शिवशंकर लातूरे, सुरेंद्र गाडवे, चंद्रशेखर होनराव, जगदीश घोडके, सुनील गाताडे,अंबादास आंधळकर,विद्याताई घोडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. रमेश आवटे पुढे म्हणाले, कोल्हापूर वीरशैव समाजाने केलेले कार्य कौतुकास्पद असून संघटना बळकट असल्यामुळेच त्यांनी केलेली प्रगती अवर्णनीय आहे. वधू वर मेळावा, धार्मिक कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम राबवून या संघटनेने दैदिप्यमान कार्य केलेले आहे. आपापसातील मतभेद टाळून संघटना वाढवण्याची खरी गरज आहे. याप्रसंगी प्रा. रमेश आवटे व शिवशंकर लातूरे यांच्या हस्ते कोल्हापूर वीरशैव समाजाचा प्रथम क्रमांकाचे मानांकन, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कोल्हापूर वीरशैव समाजाचे अध्यक्ष किरण गवळी, सचिव सुनील गाताडे, ज्येष्ठ संचालक राजू वाली, चंद्रकांत नाशिपुडे, संजय बोधले, प्रशांत करंबळी आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.
राज्य सरचिटणीस चंद्रशेखर होनराव, शिवशंकर लातूरे, सुरेंद्र गाडवे, जगदीश घोडके आदींनी शुभेच्छा दिल्या व कोल्हापूर संघटनेचे विशेष कौतुक केले.


