निपाणी शिवाजीनगर भागात महामार्गावर दोन उड्डाणपुले होणार
आम.शशिकला जोल्ले यांची माहितीःनागरीकातून समाधान

निपाणी,(प्रतिनिधी)-
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदीरकरणाचे काम सुरू असताना निपाणी शहरातून जाणाऱ्या या मार्गावर महात्मा गांधी रूग्णालय आणि शिरगुप्पी रोड भागात उड्डाणपुल नसल्याने नागरीकांना मोठा त्रास होणार होता. ही बाब लक्षात घेवून नाम.नितीन गडकरी व संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यानां लेखी निवेदन दिल्याने या दोन उड्डाणपुलांना मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली.
त्यांच्या कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होत्या. पुढें बोलताना आम.जोल्ले म्हणाल्या, गेल्या 7 ते 8 वर्षापासून महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र महामार्गाच्या पलिकडे सरकारी महात्मा गांधी रूग्णालय आणि अनेक गांवाचा संपर्क असला तरी दोन्हीकडून अर्धा ते एक कि.मी. चा फेरा मारून जावे लागत होती. ही बाब शिवाजीनगर भागातील नागरीक व आमच्या नगरसेवकांनी निर्दशनास आणून दिली. यावेळी आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी व संबधित विभागाला 19 जुलै ला पत्र देवून याबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार याठिकाणी दोन मोठ्या उड्डाणपुलांना मंजूरी मिळाली आहे. या महार्गाच्या कामासा 793 कोटी निधी मंजूर झाला होता. मात्र या दोन नवीन उड्डाणपुलामुळे 2 कोटी 58 लाखाचा जादा निधी मंजूर झाला आहे. याबाबत संबधीत खात्याने आपल्याला पत्रही पाठविले असल्याचे त्यांनी यावेळी दाखविले. तसेच या पुलामुळे महात्मा गांधी रूग्णालयांना जाणाऱ्या रूग्णांची आणि शिरगुप्पी पांंगीरे परिसरातील नागरीकांना तसेच सीबीसी शाळेस जाणाऱ्या मुलांना याचा लाभ होणार असल्याचे सांगितले.
यावेळी हालशुगर संचालक जयवंत भाटले, राजु गुंदेशा, माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील, माजी नगरसेवक दत्ता जोत्रे भाजपा शहराध्यक्ष सुरज खवरे, पिंटू बागडे यांच्यासह शिवाजीनगर भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत बंडा घोरपडे यांनी केले तर विजय टवळे यांनी आभार मानले.


