शित्तूर- वारुण पैकी ढवळेवाडी शाळेत मानव – बिबट्या विषयी मार्गदर्शन
शाहूवाडी वनविभागाचा समाज प्रबोधन व जनजागृती कार्यक्रम
शित्तूर-वारुण (शिवाजी नांगरे) येथील शित्तूर- वारुण पैकी ढवळेवाडी येथे गेले तीन – चार दिवस बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येत होते. त्याबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्र आणि युट्युब चॅनेल मधून प्रसिद्ध होत होत्या.त्याची दखल घेऊन वनविभाग शाहूवाडी यांच्याकडून रात्रीची गस्त सुरु करण्यात आली होती, तसेच 24 डिसेंबर रोजी परिमंडळ शित्तूरकडील सर्व स्टाफ समवेत जाऊन विद्यामंदिर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांना बिबट वन्य प्राण्याचा आधिवास, हालचाली, शिकार करण्याची पद्धत,बिबट वन्यप्राणी दृष्टीस पडल्यास काय करावे? व काय करू नये? याविषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.
यावेळी शाळेच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करून घेण्याच्या सुचना दिल्या, तसेच शालेय पोषण आहाराचे शिल्लक उर्वरित अन्न विल्हेवाट लावणे संबंधी माहिती देण्यात आली. शाळे सभोवतालच्या परिसराची पाहणी व टेहळणी करण्यात आली. श्री विठ्ठलाई देवी मंदिर येथे स्थानिक नागरिकांना मानव – बिबट्या सहजीवन याविषयी मार्गदर्शन व समाज प्रबोधन करण्यात आले. यावेळी शाहूवाडी वनविभागाने राबविण्यात आलेल्या उपक्रमात सदानंद जगताप (वनपाल- शित्तूर-वारूण), अभिजित कदम (वनरक्षक -कांडवण), राजाराम शिंदे (वनरक्षक – पळसवडे), बाजीराव माईंगडे, बळवंत बनसोडे वनसेवक आणि कर्मचारी व ढवळेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.


