कमला कॉलेजमध्ये माजी विद्यार्थिनी स्नेहमेळावा संपन्न

0
कमला कॉलेजमध्ये माजी विद्यार्थिनी स्नेहमेळावा संपन्न

अध्यक्षीय भाषण कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी केले

कोल्हापूर.(प्रतिनिधी) ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कमला कॉलेजच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.

         डॉ. नीता धुमाळ यांनी माजी विद्यार्थिनी संघाची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थिनींना विविध स्पर्धा परीक्षा देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कठीण विषयांची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी माजी विद्यार्थिनी संघाकडून प्रतिवर्षी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाते. प्रतिवर्षी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थिनी या शिबिराचा लाभ घेतात . यातूनच प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून विविध क्षेत्रात अधिकारी पदावर उत्कृष्टरित्या काम करीत आहेत.

       माजी विद्यार्थिनी संघाकडून या शिबिराबरोबरच आजी विद्यार्थिनीमध्ये विविध कौशल्ये विकसित व्हावीत, त्यांना स्वतःचे छोटे उद्योग सुरू करता यावेत ,त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी इत्यादीसाठी प्रतिवर्षी विविध व्याख्याने ,कार्यशाळा, वैद्यकीय शिबिरे इत्यादींचे आयोजन केले जाते तसेच कॉलेजमधील विविध स्पर्धा पुरस्कृत केल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर माजी विद्यार्थिनी संघाकडून मातृसंस्थेविषयी कृतज्ञता म्हणून आर्थिक स्वरूपात व भेटवस्तूच्या स्वरूपात देणगी देण्यात आली असून आजी विद्यार्थिनींसाठी स्कॉलरशिपही ठेवल्या असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

      या स्नेहमेळाव्यामध्ये शैक्षणिक ,सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. या माजी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतामधून कॉलेजविषयी, शिक्षकांविषयी अभिमान, आदर व कृतज्ञता व्यक्त केली. आजी विद्यार्थिनींकरिता चांगले उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

अध्यक्षीय भाषणामध्ये कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी कॉलेजच्या चौफेर प्रगतीचा आढावा घेतला. कमला कॉलेजला NACC पिअर टीम कडून A ग्रेड, यूजीसी कडून कॉलेज विथ पोटेन्शियल फोर एक्सलन्स हा विशेष दर्जा तसेच स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असून कॉलेजच्या प्रगतीच्या दृष्टीने या विशेष उल्लेखनीय व अभिमानास्पद बाबी असल्याचे त्यांनी सांगितले. कमला कॉलेज कडून विद्यार्थिनींमध्ये विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोर्सेसची माहिती दिली .तसेच कमला कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असून कॉलेजच्या उपक्रमांचा आढावा घेणारे कमला बुलेटीन ही कॉलेजने नुकतेच प्रकाशित केल्याचे सांगितले. व्यापार उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रतिवर्षी व्यापार मेळावा भरवला जातो. यावर्षीपासून माजी विद्यार्थिनींना या मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. 

         आपल्या मातृसंस्थेचा शैक्षणिक व भौतिकदृष्ट्या झालेला विकास पाहून माजी विद्यार्थिनींनी प्रभावित झाल्याचे सांगितले. कॉलेजमधील छोटे कोर्सेस जॉईन करून आपले थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्याची काही माजी विद्यार्थिनींनी इच्छा व्यक्त केली. अनेक माजी विद्यार्थिनींनी आर्थिक देणगी देऊन कॉलेजप्रती व शिक्षकांप्रती आपले प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त केली.

       खूप मोठ्या संख्येने माजी विद्यार्थिनी व माजी शिक्षक तसेच आजी शिक्षक या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार माजी विद्यार्थिनी संघाच्या उपाध्यक्ष राजनंदा देशमुख यांनी मांडले. माजी विद्यार्थिनी संघातील सर्व कार्यरत सदस्यांचे या मेळाव्याच्या आयोजनासाठी सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *