डी. वाय. पाटील कॉलेज, न्यू कॉलेज, महावीर कॉलेज मधील विद्यार्थांची प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड
एनसीसी ग्रुप मुख्यालय, कोल्हापूरसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण
कोल्हापूर.(प्रतिनिधी) पाच विद्यार्थी व सहा विद्यार्थिंनी अशा एकूण ११ एनसीसी कॅडेट्सची प्रजासत्ताक दिन परेड शिबिर (RDPC) २०२६ साठी निवड झाली आहे. हे कॅडेट्स एनसीसी संचालनालय महाराष्ट्र यांच्या प्रजासत्ताक दिन परेड तुकडीचा भाग म्हणून सहभागी होणार असून या तुकडीत राज्यभरातून १२७ एनसीसी कॅडेट्स सहभागी आहेत.
एनसीसी ग्रुप कोल्हापूरमधून निवड झालेले कॅडेट्स पुढीलप्रमाणे आहेत — हिमेश राठोड, रिद्धी पदमुखे, राधिका क्षत्रिय (डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी), मधुरा बाटे (न्यू कॉलेज, कोल्हापूर) ओंकार सुरेश पवार (वाय. सी. कॉलेज ऑफ सायन्स, कराड), प्रसाद वांगेकर (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कराड), प्रमोद चव्हाण, सुष्मिता राठोड (आर. पी. गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी), तनिष्का चव्हाण (सी. एस. कॉलेज, सातारा), निशांत चव्हाण (विलिंग्डन कॉलेज, सांगली) आणि सृष्टी पाठक (महावीर कॉलेज, कोल्हापूर).
या कॅडेट्सनी एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर व एनसीसी ग्रुप मुख्यालय पुणे येथे पार पडलेल्या कठोर व अत्यंत स्पर्धात्मक निवड प्रक्रियेत यशस्वीपणे पात्रता सिद्ध केली आहे. त्यांची निवड ही एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर व त्याअंतर्गत असलेल्या एनसीसी युनिट्सने राबवलेल्या नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण व प्रभावी प्रशिक्षणाचा परिणाम असून त्यामध्ये ड्रिल, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, व्यक्तिमत्त्व, नेतृत्वगुण व आत्मविश्वास यांवर विशेष भर देण्यात आला.
प्रजासत्ताक दिन परेड शिबिर २९ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीत निवड झालेले कॅडेट्स महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे प्रतिनिधित्व करीत विविध एनसीसी उपक्रम व स्पर्धांमध्ये सहभागी होतील. तसेच ते २६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये व माननीय पंतप्रधानांच्या एनसीसी रॅली परेडमध्ये सहभाग नोंदवतील.
या उल्लेखनीय यशाबद्दल ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, ग्रुप कमांडर, एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर, यांनी निवड झालेल्या कॅडेट्स व त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. कॅडेट्स एनसीसीची सर्वोच्च परंपरा जपत राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून एनसीसी ग्रुप कोल्हापूरचा गौरव वाढवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


