शिराळे/वारुण पैकी (पार्टेवाडी) येथील शेतक-यावर गव्याचा प्राणघातक हल्ला

0
1000195786

शिवाजी मारुती चिंचोलकर गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी

शित्तूर-वारुण (शिवाजी नांगरे)  शाहूवाडी तालुक्याच्या उत्तरेला असणाऱ्या शिराळे /वारुण पैकी पार्टेवाडी येथील शेतकरी शिवाजी मारुती चिंचोलकर ( वय 45 वर्ष ) यांच्यावर राणगव्याचा प्राणघातक हल्ला,हल्ल्यात गंभीर जखमी,पोटातील आतडी बाहेर. परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण

       चांदोली राष्ट्रीय उद्यानाला लागून असणाऱ्या परिसरातील गावांमध्ये उद्यानातील हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षात लक्षनीय वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी याच गावातील मयूर यादव या तरुणावर गव्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. आज सकाळी ११ च्या सुमारास आपल्या शेताकडे गेलेल्या शेतकरी शिवाजी चिंचोलकर या तरुण शेतकऱ्यावर गव्याने धडक मारून गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांच्या पोटावर मोठी जखम झाली.

     प्राथमिक आरोग्य केंद्र शित्तूर वारूण चे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकाने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन सदर इसमास प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आणि प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सदरच्या घटनेने परिसरातील लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पर्यटन वृद्धीसाठी जंगलात सोडण्यात आलेले हिंस्त्र प्राणी येथील मूळ रहिवाशी असणाऱ्या लोकांच्या जीवितावर उठले असताना अजूनही संबंधित वन विभागाला जाग येताना दिसत नाही. या जंगली प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येताना दिसत नाहीत.

      जंगलात सोडण्यात आलेल्या जंगली प्राण्यांमुळे, तुमच्या भागाचे आणि परिसराचे भविष्यात नंदनवन होणार अशा वल्गना प्रसारमाध्यमांशी बोलताना वरिष्ठ वन अधिकारी करत आहेत. यावर गावक-यांची तीव्र नाराजी दिसत आहे.

     आमच्या कुटुंबातील माणसांच्या मरणावर तुमचे पर्यटन विकसित होणार का? म्हणजे पर्यटन तुमचं आणि मरण आमचं! असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांतून विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *